बांदेकराच्या सुनेची नवी मालिका, फटकळ भूमिका अन् कडाक्याच्या थंडीत शूटिंग

अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'येतेच आता मी नांदायला' असं या मालिकेचं नाव असून यात तिची भूमिका अत्यंत फटकळ मुलीची आहे.

बांदेकराच्या सुनेची नवी मालिका, फटकळ भूमिका अन् कडाक्याच्या थंडीत शूटिंग
अभिनेत्री पूजा बिरारी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2026 | 11:44 AM

झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी ‘शिवानी कदम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. हुशार, शिस्तप्रिय, आत्मविश्वासू आणि आयुष्याचा आनंदाने स्वीकार करणारी शिवानी ही एक महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. शिवानीच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना पूजा बिरारी म्हणाली, “हे खूपच मजेशीर पात्र आहे. ती हुशार, शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासू आहे. आयुष्य आनंदाने जगणारी शिवानी एक यशस्वी व्यावसायिक महिला होण्याचं स्वप्न पाहते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. तिच्यासाठी तिची आई, बहीण, एक मैत्रीण आणि शेजारच्या काकू हेच तिचं संपूर्ण विश्व आहे.”

या भूमिकेसाठी झालेल्या निवडीच्या प्रक्रियेबद्दल पूजा सांगते , “इतर भूमिकांसाठी जशी निवड प्रक्रिया असते, तशीच यासाठीही झाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, जेव्हा मला ऑडिशनसाठी विचारण्यात आलं, तेव्हा उत्सुकता होती पण मनात काही विचारही सुरू होते. हे करावं की नको, असाही विचार आला. मात्र, आलेल्या कामाचा आदर करून निदान ऑडिशन तरी देऊया, असं ठरवलं. त्यानंतर साधारण दोन-तीन वेगवेगळ्या ऑडिशन्स, लूक टेस्ट आणि मॉक शूट अशी प्रक्रिया झाली. अखेर चॅनेलकडून निवड झाल्याचं कळलं, तेव्हा आनंद तर झालाच पण आता एक वेगळी जबाबदारी स्वीकारायची आहे, याचीही जाणीव झाली.”

Loading...

“माझ्या नेहमीच्या प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळा आहे. व्यक्तिरेखेची भाषा आणि तिचे वेगवेगळे पैलू समजून घेणं ही माझ्यासाठी सध्याची आव्हानं आहेत. माझी तयारी सर्वप्रथम भाषेपासून सुरू झाली. भाषा समजून घेणं, ती शिकणं आणि तिचा सराव करणं यावर मी लक्ष दिलं. आऊटडोअर शूटिंगच्या वेळी तिथल्या लोकांची भाषा आणि बोलण्याची पद्धतही मी बारकाईने पाहिली. त्याचा आपल्या व्यक्तिरेखेत कसा समावेश करता येईल, याचा विचार केला. त्याचबरोबर याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखा बाजूला ठेवून नव्याने एक वेगळी व्यक्तिरेखा घडवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे,” असं तिने पुढे सांगितलं.

आउटडोअर शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगताना पूजा म्हणाली, “आम्ही वाई इथल्या नरसिंह सरस्वती मंदिर, धोम इथं आऊटडोअर शूटिंग करत होतो. त्यावेळी आमची नाईट शिफ्ट सुरू होती आणि प्रचंड थंडी वाजत होती. मंदिर धोम धरणाच्या अगदी जवळ असल्यामुळे तिथे नदीही होती. त्या रात्रीचा अनुभव खूपच मजेशीर होता. आम्ही सगळे कलाकार शूटिंगच्या ठिकाणी शेकोटी पेटवून तिच्याभोवती बसायचो. सगळ्यांच्या सोबतीने नाईट शूट कधी पूर्ण झालं, हे कळलंच नाही. शेकोटीजवळ बसलेलो असताना प्रत्येक जण आपापलं शूट करून तिथे येत होता. कलाकारांना सीनच्या गरजेनुसार स्वेटर किंवा शाल घेता येत नव्हती. मात्र, पडद्यामागचे टीम जॅकेट, टोपी, मोजे असं सगळं घातलं होतं. आमचा सीन मंदिरात असल्यामुळे आम्हाला चप्पल न घालता शूट करावं लागत होतं. त्यामुळे थंडी आणखीच जाणवत होती. आमच्या दिग्दर्शन टीममधील एक असिस्टंट जेव्हा शेकोटीजवळ यायचा, तेव्हा आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो, ‘जरा तरी काही वाटू दे! हातात ग्लोव्हज घालून शेकोटीजवळ येतोयस तू!’ असे छोटे छोटे प्रसंग त्या शूटिंगच्या आठवणी आणखी खास करून गेले.”

या मालिकेत पूजा बिरारी आणि हर्षद अतकरी यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचीही भूमिका आहे. त्यांच्यासोबत काम करण्याविषयी पूजा म्हणाली, “उषा नाडकर्णी मॅडमना मी पहिल्यांदा प्रोमोच्या वेळी भेटले. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून मी भारावून गेले. या वयातही त्या इतक्या गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळतात आणि हाताळतात, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या आवाजातील कणखरपणा, बोलण्यातील ठामपणा आणि आत्मविश्वासपूर्ण शैली पाहून मी खूप प्रभावित झाले आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे आणि या सगळ्यांसोबत काम करताना नक्कीच खूप मजा येणार आहे.”

‘येतेच मी नांदायला’ ही मालिका येत्या 30 नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us