घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर..; आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा उखाणा ऐकलंत का?
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीशी तो लग्न करणार आहे. या दोघांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर पूजाचं केळवण पार पडलं.

अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री पूजा बिरारीशी तो लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी सोहमचं त्याच्या मावश्यांनी केळवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पूजा बिरारीचंही केळवण पार पडलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या टीम पूजाचं धूमधडाक्यात केळवण केलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी पूजाने सोहम बांदेकरच्या नावाचा खास उखाणासुद्धा घेतला होता. या उखाण्याच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
पूजा बिरारीने घेतला उखाणा
“घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजेच सोहम आता होणार माझे मिस्टर”, असा उखाणा पूजाने यावेळी घेतला आहे. हा उखाणा ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसंच पूजाला साडीसुद्धा भेट दिली. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत पूजा मंजिरीची भूमिका साकारतेय. तर अभिनेता विशाल निकम त्यात रायाच्या भूमिकेत आहे.
View this post on Instagram
पूजाचा होणारा पती सोहमने निर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. त्याचप्रमाणे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत त्याने अभिनयसुद्धा केला आहे. तर पूजाने ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. ‘स्वाभिमान’ या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
याआधी सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये सोहमने लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी आहे, याबाबतचा खुलासा केला होता. चाहत्याच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं होतं, ‘कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस.’ सोहम कोणाशी लग्न करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. पूजा बिरारीच्या नावाची चर्चा असतानाच गणेशोत्सवादरम्यान तिला बांदेकरांच्या घरी पाहिलं गेलं. त्यानंतर दिवाळीनिमित्त जेव्हा पूजाने तिच्या आई-वडिलांसोबतच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, तेव्हा सोहमने त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
