लगीनघाईदरम्यान सोहम बांदेकरकडून प्रेमाची जाहीर कबुली; होणारी नवरी ‘परम सुंदरी’!
बांदेकरांच्या घरात लगीनघाई सुरू असून नुकतंच सोहम बांदेकरचं केळवण पार पडलं. एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार असून सोशल मीडियावर त्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर त्याने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलंय.

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. गेल्या काही महिन्यांपासून सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोहमची होणारी बायको आणि बांदेकरांची होणारी सून कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावरून काही दिवसांपूर्वीच पडदा उचलण्यात आला. त्यानंतर आता सोहमने जणू प्रेमाची जाहीर कबुलीच दिली आहे. सोहम एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न करणार असून तिच्या एका पोस्टवर त्याने अत्यंत प्रेमळ कमेंट केली आहे.
पूजा बिरारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीनिमित्त खास फोटो पोस्ट केले होते. हे फोटो तिच्या आईवडिलांसोबतचे होते. लक्ष्मीपूजन आणि आईवडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. मात्र त्यापैकी सोहमच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलंय. सोहमने या फोटोवर हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यावर पूजानेही त्याला रिप्लाय दिला आहे. पूजाने हार्ट आणि लव्हचा इमोजी रिप्लायमध्ये पोस्ट केला आहे. त्यामुळे एका अर्थी या दोघांनी जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

सोहमने निर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. त्याचप्रमाणे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत त्याने अभिनयसुद्धा केला आहे. सोहमची होणारी पत्नी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिचं नाव पूजा बिरारी असं आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत पूजा मंजिरीची भूमिका साकारतेय. याशिवाय ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलंय. ‘स्वाभिमान’ या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
याआधी सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये सोहमने लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी आहे, याबाबतचा खुलासा केला होता. चाहत्याच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं होतं, ‘कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस.’
