अखेर ‘या’ तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर 'मोस्टली सेन' म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ताच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. बॉयफ्रेंड वृषांक खनालशी ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

अखेर या तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Prajakta Koli
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2025 | 3:31 PM

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, अभिनेत्री आणि लेखिका प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘मोस्टली सेन’ या नावाने प्राजक्ता सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून ती वकील वृषांक खनालला डेट करतेय. सप्टेंबर 2023 मध्ये प्राजक्ता आणि वृषांकने त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचं ठरवलं. त्यानंतर अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. प्राजक्ताच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी प्राजक्ताचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मेहंदी, हळद, संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. 23 फेब्रुवारीपासून प्राजक्ताच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. हे सर्व कार्यक्रम आणि लग्नसोहला कर्जतमध्ये पार पडणार असल्याचं कळतंय. प्राजक्ता प्रकाशझोतात येण्यापूर्वीपासूनच ती वृषांकसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. प्राजक्ताचा होणारा पती वृषांक हा नेपाळमधील काठमांडू इथला आहे. सुरुवातीच्या काळात बीबीएमद्वारे हे दोघं एकमेकांशी संपर्क साधायचे. त्यानंतर एका मित्राच्या गणपती पुजेला दोघांची भेट झाली. तेव्हा वृषांकने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं. इथूनच दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.

प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 84 लाख फॉलोअर्स आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मिसमॅच्ड’ या वेब सीरिजद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ही सीरिज तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचप्रमाणे प्राजक्ताने लेखनातही विशेष कामगिरी केली आहे. जानेवारी महिन्यात तिने ‘टू गुड टू बी ट्रू’ हे पुस्तक प्रकाशित केलं. याशिवाय ती ‘अंधेरा’ या हॉरर सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्राजक्ता कोळीने तिच्या करिअरची सुरुवात रेडिओ इंटर्न म्हणून केली. त्यानंतर तिने ‘मोस्टली सेन’ (Mostly Sane) नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. प्राजक्ताने ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिने अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत काम केलंय.