Prajakta Kulkarni : मला शिल्पाला थोबाडीत मारायचं होतं…प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितला किस्सा; काय घडलेलं?
Prajakta Kulkarni On Shilpa Shetty : मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीनं नुकत्याच एका मुलाखतीत शिल्पा शेट्टीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग‘ या मालिकेत कल्पनाची भूमिका साकारत आहेत. प्राजक्ता यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्या 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आग‘ या सिनेमात झळकल्या होत्या. या सिनेमात शिल्पा शेट्टीसह अनेक कलाकार झळकले होते. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत प्राजक्ता कुलकर्णी यांनी शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला आहे.
प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितला किस्सा
‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या की, ‘मी जेव्हा ‘आग’ सिनेमात काम केलं होतं. तेव्हा सुद्धा शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. मला त्या सिनेमात शिल्पाला थोबाडीत मारायचं होतं आणि तिला तो सीन परफेक्ट तिथेच मिस करता येत नव्हता. त्यामुळे आम्हा दोघींचे अनेक रिटेक झाले. शेवटी तिने मला समोरून सांगितलं की, तुम्ही मला खरंच एक कानाखाली मारा.त्या सीनसाठी तिनं मला स्वत:हून परवानगी दिली होती. तिनं स्वत:हून पुढाकार घेतला म्हणून, तो सीन चांगला होऊ शकला.’
‘तुमच्याबरोबर जर असा सहकलाकार असेल तर काम करणं फार सोपं जातं. मी म्हणूनच म्हणते की, मराठीपेक्षा मला हिंदीत जास्त चांगले सहकलाकार भेटले.’ असं प्राजक्ता यांनी शेवटी सांगितलं.
यापूर्वी प्राजक्ता एका मुलाखतीत म्हणालेल्या की, ”आग’ सिनेमाच्या सेटवर मी आणि शिल्पा शेट्टी आम्ही दोघी फावल्या वेळात कादर खान यांच्याकडून उर्दू शिकायचो. शिल्पाचा स्वभाव सुद्धा खूपच गोड आहे. तिला मराठी समजतं आणि बोलायला सुद्धा आवडतं. एकदम खरं सांगायचं झालं तर, इंडस्ट्रीत काम करताना मला मराठी अभिनेत्रींचा वाईट अनुभव आलाय. पण, याउलट मला हिंदी अभिनेत्रींचा खरंच खूप चांगला अनुभव आलाय. मध्यंतरी शिल्पा मला अनेक वर्षांनी भेटलेली, तेव्हाही माझ्याशी चांगलं बोलली.’ ‘अभिजात मराठी‘ला दिलेल्या प्राजक्ता कुलकर्णी बोलत होत्या.
