Prajakta Mali: प्राजक्ता माळीने या कारणामुळे अचानक सोडलं नॉनव्हेज; स्वतःच सांगितलं कारण, म्हणाली..
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी पूर्वी मांसाहार करायची. मात्र, नंतर तिने नॉनव्हेज खाणं सोडलं. मांसाहार सोडण्यामागचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता आरोग्याच्या कारणामुळे तिने व्हिगन जीवनशैली स्वीकारली आहे.

Prajakta Mali : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. तिच्या डाएटपासून ते त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काही काळापासून प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या आहारातील बदलांविषयी सांगितलं होतं. विशेष म्हणजे प्राजक्ता पूर्वी नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार करायची, मात्र नंतर तिने नॉनव्हेज खाणं पूर्णपणे सोडलं. तिने मांसाहार सोडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं.
‘मांसाहार करणाऱ्यांच्या विरोधात नाही, पण…’
एका मुलाखतीत आपल्या डाएटविषयी बोलताना प्राजक्ता म्हणाली होती की, ती आता शाकाहारी झाली आहे. मात्र मांसाहार करणाऱ्या लोकांविरोधात आपण नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. यावेळी तिने नॉनव्हेज खाणं सोडण्यामागचं कारण सांगितलं. “माणसांची आणि प्राण्यांची पचनसंस्था वेगवेगळी असते. मांसाहार पचवण्यासाठी मानवी शरीराला 72 तास लागतात. त्यामुळे मांसाहार हा माणसांसाठी योग्य नाही. यासंदर्भात काही डॉक्युमेंट्रीजही उपलब्ध आहेत. मीसुद्धा आधी नॉनव्हेज खायची, मात्र नंतर ते खाणं सोडलं”, असं प्राजक्ताने सांगितलं होतं.
ताजं अन्न खाण्यावर प्राजक्ताचा भर
प्राजक्ता केवळ मांसाहार टाळत नाही, तर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याबाबतही ती विशेष काळजी घेते. शिळं अन्न आणि पॅकेज्ड फूड खाणं टाळावं, असं तिचं मत आहे. आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसून येतो, असं ती सांगते. त्यामुळे शक्य तितकं ताजं अन्न खाण्यावर तिचा भर असतो. चांगलं खाणं आणि योग्य दिनचर्या या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या असल्याचं प्राजक्ता सांगते.
जेवणात दोन तासांचं अंतर ठेवण्याचा सल्ला
प्राजक्ताने तिच्या मुलाखतीत जेवणाच्या वेळांबाबतही काही टिप्स दिल्या होत्या. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाऊ नये, असं ती सांगते. या काळात पाणी पिण्यास हरकत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. एखाद्या लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमात जास्त जेवण झालं, तर दुसऱ्या दिवशी ती लंघन करते. म्हणजेच दुसऱ्या दिवशी केवळ फळं खाऊन दिवस घालवते. फरसाणसारखे पदार्थही ती खाते. मात्र रोजच्या आहारात त्यांचा समावेश करत नसल्याचं तिने सांगितलं होतं.
आता प्राजक्ता झाली व्हिगन
यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्राजक्ताने तिच्या आहाराबाबत आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला. तिने आता व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय आवडीने नव्हे, तर आरोग्याच्या कारणामुळे घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शरीराला सहन होत नसल्याने सतत खोकल्याचा त्रास होत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थही आहारातून वगळण्याचा निर्णय तिने घेतला. सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.