
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी स्नान केलंय. महाकुंभमध्ये यात्रेकरुंची संख्या दिवसागणिक वाढत असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि अध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत आहेत. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा कुंभमेळ्याला पोहोचली आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने प्रयागराजची झलक दाखवली आहे. तिथली व्यवस्था, विविध आखाडे, साधूसंतांची भेट, देवदेवतांची पूजा आणि त्यानंतर संगममध्ये पवित्र स्नान.. हे सर्व प्राजक्ताच्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव, असं लिहित तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
‘तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५. लहानपणापासूनच कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. 144 वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अनुभव’, अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली आहे.
कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. तर दर सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरत असतो. मात्र आता प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ हा 144 वर्षांतून एकदा होणारा महाकुंभमेळा आहे. त्यामुळे त्याचं पावित्र्य अधिकच वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा महाकुंभमध्ये स्नान केलंय. मराठी कलाविश्वातील अभिनेता स्वप्निल जोशी, सौरभ चौगुले यांनीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलंय. केवळ भारतीयच नाही तर परदेशातूनही असंख्य भाविक याठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. जगप्रसिद्ध म्युझिक बँड ‘कोल्ड प्ले’चा मुख्य गायक ख्रिस्ट मार्टिनसुद्धा गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनसोबत महाकुंभमध्ये पोहोचला होता. यावेळी दोघांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं.
महाकुंभमध्ये निरनिराळ्या पंथांचे 13 आखाडे सहभागी झाले आहेत. 45 दिवसांपर्यंत हा कुंभमेळा पार पडणार आहे. येत्या माघ पौर्णिमेला संगममध्ये शाही स्नान होतील.