
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण आणि लोकप्रिय रील स्टार प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रथमेशच्या जाण्याने मराठी सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यातच आता प्रथमेशच्या बहिणीची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
प्रथमेश कदम हा इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतच्या मजेशीर आणि कौटुंबिक रील्ससाठी ओळखला जायचा. मायलेकाचं प्रेम, त्यांच्यातील गोड संवाद आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील साधेपणा यांमुळे तो सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध होता. प्रथमेशच्या या कंटेटमुळे तो लोकप्रिय झाला होता. अनेकदा तो आपल्या व्हिडीओमधून आईच्या कष्टाचे आणि त्यांच्या नात्याचे महत्त्व सांगत असे. याच कारणामुळे त्याची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणावर वाढली होती.
प्रथमेशच्या पश्चात त्याची आई प्रज्ञा कदम आणि बहीण प्रतिक्षा कदम असा परिवार आहे. विशेष म्हणजे, प्रथमेशच्या निधनाच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्याची बहीण प्रतिक्षा हिने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने एका टेडी-बिअरसोबत रील केला होता. या रीलला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
“भाऊ कसाही असू दे, पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो…”, असे कॅप्शन तिने रिलला दिले होते. यासोबतच तिने इतर बहिणींना आपल्या भावाला टॅग करण्याचे आवाहन केले होते. या व्हिडीओला तिने एका मराठी चित्रपटातील खारी हे गाणे बॅकग्राऊंडला लावले होते. ज्यामुळे प्रथमेशच्या चाहते त्याच्या आठवणीत अधिकच भावूक झाले आहेत.
दरम्यान डिसेंबर महिन्यात प्रथमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपण आजारी असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्याने लवकरच बरा होऊन परत येण्याचा विश्वासही व्यक्त केला होता. मात्र आज त्याचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर त्याच्या निधनाची एक अत्यंत भावूक पोस्ट लिहून प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली आहे. आता सध्या सोशल मीडियावर अनेक जण त्याचे जुने व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओद्वारे ते प्रथमेशला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.