आता परीक्षा देवाची.., प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’मध्ये कोणाची मुख्य भूमिका? प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची घोषणा केली असून सोशल मीडियावर नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. जवळपास अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळबंद' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

अकरा वर्षांपूर्वी 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहुना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यामुळे आजही ‘देऊळ बंद’ हा चित्रपट आवर्जून बघितला जातो. ‘देऊळ बंद’चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘देऊळ बंद 2’ची घोषणा केली. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद 2’चं डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेलं देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर 2 या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. आता ‘देऊळ बंद 2’ हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त होत आहे.
‘आता परीक्षा देवाची..’ या टॅगलाइनसह हे पोस्टर प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसंच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत, हे अद्याप गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २’चं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून त्याची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळबंद’ या चित्रपटात गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, गिरीजा जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, सुनील अभ्यंकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.