‘आकाशातून राख..’, लॉस एंजेलिसमधील रौद्ररुपी वणवा पाहून घाबरली प्रिती झिंटा; सांगितली परिस्थिती

लॉस एंजेलिसमध्ये भीषण वणवा पेटला असून गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लॉस एंजेलिसमध्ये राहणारी अभिनेत्री प्रिती झिंटाने नुकतीच याविषयी पोस्ट लिहिली आहे. ती आणि तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती प्रितीने या पोस्टद्वारे दिली.

आकाशातून राख.., लॉस एंजेलिसमधील रौद्ररुपी वणवा पाहून घाबरली प्रिती झिंटा; सांगितली परिस्थिती
Preity Zinta
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2025 | 10:58 AM

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री प्रिती झिंटाने 2016 मध्ये लॉस एंजिलिसमधील फायनान्शिअल एनालिस्ट जीन गुडइनफशी लग्न केलं. त्यानंतर ती अमेरिकेला राहायला गेली. फक्त कामानिमित्त ती भारतात ये-जा करताना दिसते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसजवळ ‘हॉलिवूड हिल्स’ भागात भीषण वणवा पेटल्याप्रकरणी प्रितीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ती आणि तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती तिने या पोस्टद्वारे दिली. त्याचप्रमाणे लॉस एंजेलिसमधील भीषण वास्तवाविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

प्रिती झिंटाची पोस्ट-

‘मला कधीच वाटलं नव्हतं की मी असा दिवस पाहण्यासाठी जिवंत असेन, जेव्हा लॉस एंजेलिसमध्ये आमच्या आजूबाजूच्या परिसराला आग लागलेली असेल आणि माझ्या कुटुंबाला, मित्रमैत्रिणींना घराबाहेर काढलं जाईल किंवा हाय अलर्टवर ठेवलं जाईल, धुराने दाटलेल्या आकाशातून बर्फवृष्टीसारखी राख पडेल, वारा शांत झाला नाही तर लहान मुलं आणि वृद्धांसोबत आम्ही काय करू याची भीती आणि अनिश्चितता सतावेल. आमच्या आजूबाजूला होत असलेल्या विध्वंसाने मी प्रचंड दु:खी आहे. सध्यातरी आम्ही सुरक्षित आहोत यासाठी मी देवाचे आभार मानते’, अशा शब्दांत प्रिती व्यक्त झाली.

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘या आगीमुळे विस्थापित झालेल्या आणि सर्वस्व गमावलेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करते आणि सहानुभूती व्यक्त करते. वारा लवकरच शांत होईल आणि आग आटोक्यात येईल अशी आशा करते. अग्निशमन विभाग, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि लोकांचा जीव, मालमत्ता वाचवण्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्वांनी सुरक्षित राहा.’

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह तिच्या लॉस एंजेलिसमधील बंगल्यात राहतेय. प्रियांकानेही तिच्या बंगल्याच्या खिडकीतून काही मैलांवर असलेल्या टेकड्यांवर लागलेल्या आगीचा फोटो शेअर केला होता. ‘माझ्या भावना सर्वांसोबत आहेत. मला आशा आहे की आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू शकू’, असं तिने लिहिलं होतं. तिने अग्निशमन विभाग आणि बचाव कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.

दुसरीकडे अभिनेत्री नोरा फतेही लॉस एंजेलिसमधून भारतात परतली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात असं कधीच पाहिलं नव्हतं. ही परिस्थिती मी शब्दांत मांडू शकत नाही. आम्हाला पाच मिनिटांपूर्वी तिथून जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मी लगेच माझं सामान घेतलं आणि तिथून निघून आली. मी जवळच्या एअरपोर्टवर जाऊन तिथेच थांबणार आहे. कारण आज माझी फ्लाइट आहे आणि सुदैवाने मला ती मिळेल अशी अपेक्षा करते. या आगीमुळे माझी फ्लाइट रद्द होऊ नये. ही परिस्थिती खूपच भयावह आहे. मी कधीच असं अनुभवलं नव्हतं.”