Nagar Parishad Election Results 2025 : अवघ्या 10 मिनिटाचा कौल… भाजप आघाडीवर शिंदे, ठाकरे, पवारांचे काय?
राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या 2025 च्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. शिंदे आणि अजित पवार गट खालोखाल असून, ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसला आहे. काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली आहे. हे प्राथमिक कल असून अंतिम निकाल येणे बाकी आहे.

राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात झाली आहे. अवघ्या 10 मिनिटात या निवडणुकीचे कल समोर आले आहेत. पहिल्या दहा मिनिटातील निवडणूक कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार गट त्या खालोखाल आहेत. मात्र, सुरुवातीच्या कलामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाची अवस्था अत्यंत दारूण झालेली दिसत आहे. मात्र, काँग्रेसनेही चांगली आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांवरून तरी राज्यात काँग्रेसचा बेस अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. तर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं निर्विवादपणे दिसून येत आहे.
अवघ्या दहा मिनिटात निवडणुकीचे कल आले आहेत. यामध्ये भाजप 111, शिंदे गट 39 तर अजितदादा गट 31 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस 37, ठाकरे गट 5 आणि शरद पवार गट 9 जागांवर आघाडीवर आहे. युती आणि आघाडीचे चित्र पाहिलं तर युती 181 जागांवर तर महाविकास आघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे. तसेच स्थानिक आघाड्यांनी सहा जागांवर आघाडी घेतलेली दिसत आहे. मात्र हे सुरुवातीचे कल आहेत. यात अजून फेरफार होण्याची शक्यता आहे. अजून अंतिम निकाल आलेले नाहीत. अंतिम निकाल 12 वाजेपर्यंत समोर येतील. त्यावेळी कुठला पक्ष आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे हे दिसून येणार आहे.
प्रयत्नांना यश येणार ?
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र दिसलं नाही. या उलट महायुतीतील पक्षांचीच एकमेकांविरोधात लढत असल्याचं चित्र अधिक दिसत होतं. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट काही ठिकाणी एकत्र लढले तर काही ठिकाणी स्वबळावर लढले. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड सभा घेतल्या. गावागावात जाऊन रान पेटवलं होतं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोडता महाविकास आघाडीचे बडे नेते काही प्रचार सभा घेताना दिसले नाही. शरद पवार यांच्या फार कमी सभा झाल्या. तर उद्धव ठाकरे यांनी एकही सभा घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत वातावरण निर्माण करता आलं नाही.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत राणे कुटुंब, एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, गोपिचंद पडळकर, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि इतर नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे या नेत्यांना आपला गड राखता येणार की गमावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
