Dalimb: हरवलेलं मूल, हतबल बाप अन् मुखवट्यामागचा आरोपी..; प्रिया बापटच्या ‘डाळिंब’चा थरारक ट्रेलर
अभिनेत्री प्रिया बापटच्या ‘डालिंब’ या सायकॉलॉजिकल थ्रिलरचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात हरवलेलं मूल, हतबल बाप आणि मुखवट्यामागचा आरोपी यांचं रहस्य उलगडणार आहे. जाणून घ्या चित्रपटाची कथा, स्टारकास्ट आणि रिलीज डेट..

Dalimb: अभिनेत्री प्रिया बापट आता एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता जितेंद्र कुमारसुद्धा झळकणार आहे. प्रिया आणि जितेंद्र यांच्या या चित्रपटाचं नाव ‘डाळिंब’ असून या सायकॉलॉजिकल थ्रिलरचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातील रहस्यमय कथानकाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हरवलेलं मूल, त्याचा शोध घेणारा हतबल पिता आणि त्याच इमारतीत वावरणारा एक अनोळखी खुनी, अशा घटनांभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ‘डाळिंब’ची कथा?
‘डाळिंब’च्या जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात सूरज कुमार (जितेंद्र कुमार) आणि त्याचा मुलगा आदि यांच्या आनंदी क्षणांनी होते. मात्र, अचानक आदि बेपत्ता होतो आणि सूरजचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तो इमारतीच्या कानाकोपऱ्यात फिरू लागतो. मात्र, त्याला कोणाकडूनही अपेक्षित मदत मिळत नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी (प्रिया बापट) घटनास्थळी पोहोचते. ती इमारतीतील रहिवाशांची चौकशी करते. मुलगा नेमका कुठे गेला? त्याचं अपहरण झालं आहे का? इमारतीमध्येच एखादा आरोपी लपलेला आहे का? असे अनेक प्रश्न ट्रेलरमध्ये उपस्थित होतात. जसजशी चौकशी पुढे सरकते, तसतशी या प्रकरणातील गूढता वाढत जाते.
पहा ट्रेलर-
मुखवट्यामागे दडलंय कोणतं रहस्य?
या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण म्हणजे पारंपरिक नृत्यू करणारा एक रहस्यमय लोककलाकार. चेहऱ्यावर वेगळाच मुखवटा, विचित्र विधी आणि पार्श्वभूमीला वाजणारं अस्वस्थ करणारं संगीत यामुळे ट्रेलरमध्ये भय आणि थराराचं वातावरण निर्माण होतं. या लोककलाकाराचा सूरजच्या आयुष्याशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘डाळिंब’मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत क्षितीश दाते, कविन दवे, साई प्रसाद, हरीश कुलकर्णी आणि सागर यादव हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रिया एव्हन यांनी केलं आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?
‘डाळिंब’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर येणार आहे. येत्या 4 डिसेंबर 2026 रोजी ZEE5 वर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. त्यामुळे सस्पेन्स, थरार आणि रहस्यमय कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डाळिंब’ हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो.