Priya Marathe Death: …आणि अक्षरशः थरथरायला झालं, प्रियाच्या निधनानंतर ‘ते’ फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट

Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे... अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

Priya Marathe Death: ...आणि अक्षरशः थरथरायला झालं, प्रियाच्या निधनानंतर ते फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट
फाईल फोटो
| Updated on: Sep 01, 2025 | 1:39 PM

Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगावर उपचार घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने कर्करोगावर मात देखील केली. पण पुन्हा तिची प्रकृती खालावली… ‘तुझेच मी गीत गात आहे’ या माहिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. पण मालिका सुरु असताना प्रियाला कर्करोगाचं निदान झालं आणि प्रियाने मालिकेतून ब्रेक घेतला. अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रियासाठी पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मराठी अभिनेत्री शुभांगी भुजबळने प्रियासाठी पोस्ट शेअर केलीये.

शुभांगी, प्रियाचे फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘प्रिया, बातमी कळल्यापासून तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. आपण पहिल्यांदा एकत्र काम केलं “येऊ कशी कशी मी नांदायला” आणि नंतर “तू भेटशी नव्याने” या मालिकेत.’

कायम हसून स्वागत करणारी, शांत, संयमी असंच तुला बघितलं…. थोडी ओळख झाल्यावर तुझ्या गप्पा आणि खळखळून हसणंही जवळून अनुभवलं. आवडलं तुझ्याबरोबर काम करणं. दोन्ही मालिकेत तुझे माझे सीन कधीच फारसे एकत्र नव्हते पण तरी “तू भेटशी नव्याने” च्या वेळी, आज तू पण आहे सेटवर कळलं की मी हमखास तुला किमान हॅलो करायला यायचे…. कारण छान वाटायचं तुला भेटून.

 

पाच सहा दिवस सेटवर दिसली नाहीस म्हणून चौकशी केली तेव्हा तुझ्या कॅन्सर बद्दल कळलं आणि अक्षरशः थरथरायला झालं, संपूर्ण अंगातून कळी गेली, माझ्या आणि भक्तीच्या डोळ्यात पाणीच आलं. कळतच नव्हतं काय react करायचं ते. पण दुसऱ्या क्षणी वाटलं तू लढशील आणि परत लवकरच एका नव्या भूमिकेत दिसशील. प्रिया… एवढी वेगळी भूमिका स्वीकारशील असं वाटलंच नव्हतं… जी आम्हाला कधी बघायलाच नाही मिळणार. Thank you प्रिया जेवढा काळ भेटलीस त्या सगळ्याबद्दल चांगल्या आठवणी आहेत आणि तशीच कायम आठवणीत राहशील.

येऊ कशी तशी मी नांदायला च्या वेळी जयगडच्या गणपती मंदिरात तुझे हे फोटो मी काढले होते. तुला पाठवले होते पण माझ्याकडेही जपून ठेवले होते…. कारण तू जशी गोड आहेस तशीच दिसते आहेस ह्या फोटोत. पण हे फोटो आज तुझ्या जाण्याच्या निमित्ताने शेअर करेन असं वाटलं नव्हतं…. प्रिया कायम अशीच हसत रहा. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रिया मराठे हिने वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एवढंच नाही तर, सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रियाचे फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला.