
मराठीसह हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. वयाच्या 38 व्या वर्षी तिने मीरा रोड इथल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मीरा रोड इथल्या मुक्तिधाम स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती शंतनू मोघे आणि परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुरू होते. अखेर रविवारी ही झुंज अपयशी ठरली. अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिजीत केळकर, ओमप्रकाश शिंदे, सुयश टिळक, आस्ताद काळे, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये, स्वप्नाली पाटील, प्रार्थना बेहेरे, जुई गडकरी, समिधा गुरू, मंगल केंकरे, शर्मिला शिंदे या कलाकारांनी प्रियाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं प्रियासोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. प्रियाचा अखेरचा निरोप देताना प्रार्थना हमसून हमसून रडत होती. यावेळी इतर कलाकारांनाही अश्रू अनावर झाले. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी प्रियाबद्दल बोलताना भावनाविवश झाल्या होत्या. “वाटलं नव्हतं इतक्या लवकर ती जाईल म्हणून. असं नको व्हायला, देव असं का करतो कळत नाही मला… त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं… बिचारी… देव तिच्या आत्म्याला शांती देवो… हे तिचं जायचं वय नव्हतं,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
प्रिया मराठेनं ‘या सुखांनो या’ मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथ निभाना साथिया’ अशा हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. अभिनेता शंतनू मोघेबरोबर प्रियाचा 2012 मध्ये विवाह झाला. दोघांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं.