
‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी (27 जून) रात्री निधन झालं. शेफालीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तिने वयाच्या 42 व्या वर्षीच आपला जीव गमावल्याचं म्हटलं जात आहे. शेफालीच्या निधनावर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रियांका आणि शेफालीने ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये शेफाली पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. प्रियांकाने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेफालीचा फोटो पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं.
‘मला खूप मोठा धक्का बसला आहे. ती खूपच तरुण होती. पराग आणि तिच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करते’, अशा शब्दांत प्रियांकाने भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी रात्री शेफालीच्या निधनानंतर शनिवारी संध्याकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीच्या निधनाने तिचा पती पराग त्यागी आणि इतर कुटुंबीय पूर्णपणे खचले आहेत.
मुंबईतील कूपर रुग्णालयात शेफालीचं शवविच्छेदन करण्यात आलं. पोस्ट मॉर्टमचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर पाच डॉक्टरांकडून पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बनवला जात असल्याचंही म्हटलं गेलंय. शेफालीच्या निधनानंतर पोलिसांनी 14 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये तिच्या कुटुंबीयांचा, घरातील कर्मचाऱ्यांचा, जवळच्या मित्रमैत्रिणींचा समावेश आहे. यासोबतच शेफाली आणि तिचे कुटुंबीय ज्या मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करायचे, तिथल्या फार्मासिस्टचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. शेफाली ज्या इमारतीत राहायची, तिथले सात सीसीटीव्ही फुटेजचे नमुनेही पोलिसांनी घेतले आहेत. तिच्या घरी कोण कोण आलं होतं, कॅमेऱ्यात काही संशयास्पद गोष्टी कैद झाल्या का, हे यातून तपासण्यात येणार आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीच्या अहवालात असंही म्हटलंय की शेफालीचा मृत्यू कमी रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि जठरासंबंधीच्या आजारामुळे झाला आहे. परंतु यासंदर्भात सविस्तर तपशील पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधूनच समोर येण्याची शक्यता आहे.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.