महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणारे शिवराय; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा दमदार ट्रेलर

महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणारे शिवराय; पुन्हा शिवाजीराजे भोसलेचा दमदार ट्रेलर
Punha Shivajiraje Bhosale trailer
Image Credit source: Youtube
Updated on: Oct 12, 2025 | 9:19 AM

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच त्यांची उत्कंठा शिगेला पोहचविणारा ट्रेलर नुकताच एका दिमाखदार कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांसोबतच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी रोचक कल्पना असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलरही अंगावर शहारे आणणारा असाच झाला आहे.

चित्रपटाच्या या ट्रेलर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रखरपणे मांडणारा चित्रपट आहे. महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना मनात जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. शेतकऱ्यांचा विषय अशा पद्धतीने मांडणं हे धाडसाचं काम आहे आणि हे धाडस आजच्या घडीला फक्त महेश मांजरेकर करु शकतात हेही तितकंच खरं आहे. आातापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या कलाकृती या इतिहासावर आधारित होत्या. परंतु हा चित्रपट इतिहास आणि वर्तमानाच्या सुरेख संगमावर उभा राहून शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आहे. या चित्रपटाला प्रेक्षक उचलून धरतील यात शंकाच नाही.”

पहा ट्रेलर-

दिग्दर्शक महेश म्हणाले, “शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार करत होतो आणि त्या प्रक्रियेत या चित्रपटाची निर्मिती झाली. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे.”

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ बोडके म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. यात शिवरायांचं प्रचंड संतप्त आणि उद्विग्न रूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागला अर्थात त्यात महेश मांजरेकर सरांची खूप मदत झाली. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल असा ठाम विश्वास आहे.”

चित्रपटात इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.