
प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप म्युझिक इंडस्ट्री सावरली नाही, इतक्यात आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पंजाबी संगीतकार चरणजीत अहुजा यांचं निधन झालं. 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. चंदीगडमधील पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर कर्करोगाशी त्यांची ही झुंज अपयशी ठरली. चरणजीत अहुजा यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.
‘संगीत सम्राट उस्ताद चरणजीत अहुजा यांचं निधन म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचं मोठं नुकसान आहे. त्यांचं संगीत नेहमीच पंजाबी लोकांच्या हृदयात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि प्रियजनांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. तर गायक जसबीर जस्सी यांनी चरणजीत यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘पंजाबी संगीताचे बादशाह, संगीतातील तज्ज्ञ, संपूर्ण जगाचे गुरू, उस्ताद चरणजीत यांनी जगाचा निरोप घेतला.’ सलीम शहजादा यांनी म्हटलं, ‘आज संगीत जगताने एक दिग्गज गमावला आहे. पंजाबी संगीतासाठी चरणजीत यांनी जे केलं ते दुसरं कोणीही करू शकलं नाही.’ निर्मला ऋषी यांनीसुद्धा भावनिक पोस्ट लिहिली आहे. चरणजीत अहुजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रादेशिक आणि बॉलिवूड चित्रपटांच्या संगीतात योगदान दिलं आहे.
ਸੰਗੀਤ ਸਮਰਾਟ ਉਸਤਾਦ ਚਰਨਜੀਤ ਅਹੂਜਾ ਸਾਬ੍ਹ ਦਾ ਚਲੇ ਜਾਣਾ ਸੰਗੀਤ ਇੰਡਸਟਰੀ ਲਈ ਨਾ ਪੂਰਾ ਹੋਣ ਵਾਲਾ ਘਾਟਾ ਹੈ। ਆਹੂਜਾ ਸਾਬ੍ਹ ਵੱਲੋਂ ਬਣਾਈਆਂ ਧੁਨਾਂ ਹਮੇਸ਼ਾ ਪੰਜਾਬੀਆਂ ਦੇ ਦਿਲਾਂ ‘ਤੇ ਰਾਜ ਕਰਦੀਆਂ ਰਹਿਣਗੀਆਂ। ਸਚਿਨ ਅਹੂਜਾ ਸਮੇਤ ਪਰਿਵਾਰ ਤੇ ਚਾਹੁਣ ਵਾਲਿਆਂ ਨਾਲ ਦਿਲੋਂ ਹਮਦਰਦੀ। ਪਰਮਾਤਮਾ ਰੂਹ ਨੂੰ ਚਰਨਾਂ ‘ਚ ਥਾਂ ਦੇਣ।
—
संगीत सम्राट… pic.twitter.com/X7km0fG1AN— Bhagwant Mann (@BhagwantMann) September 21, 2025
चरणजीत अहुजा हे पंजाबी संगीताचे बादशाह मानले जात होते. त्यांनी केवळ पंजाबीच नाही तर बॉलिवूड चित्रपटांसाठीही साऊंडट्रॅक तयार केले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गुरुदास मान, अमर सिंग चमकीला आणि कुलदीप मानक यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं आणि पंजाबी संगीताला नवीन उंचीवर नेलं. चरणजीत अहुजा यांच्या हिट गाण्यांमध्ये ‘की बनू दुनिया दा’, ‘गबरू पंजाब दा’, ‘दुष्मनी जट्टा दी’ आणि ‘तुफान सिंग’ यांचा समावेश आहे.