Zubeen Garg : प्रसिद्ध गायकाचा सिंगापूरमध्ये कसा मृत्यू झाला? आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सत्य
Zubeen Garg death reason : 'या अली', 'जाने क्या चाहे मन बावरा' यांसारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांचा गायक झुबीन गर्गचं सिंगापूरमध्ये निधन झालं. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या निधनामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Zubeen Garg : लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या झुबीनचा तिथे स्कूबा डाइव्हिंगदरम्यान मृत्यू झाला. जेव्हा त्याचं पार्थिव गुवाहाटी विमानतळावर पोहोचलं, तेव्हा त्याला अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. झुबीनच्या मृत्यूबाबत बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सिंगापूर सरकारद्वारे जारी केलेल्या झुबीनच्या मृत्यू प्रमाणपत्राचा खुलासा केला आहे. या प्रमाणपत्रानुसार झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. त्याच्या पार्थिवावर गुवाहाटीजवळील गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना बुडाल्याने झुबीनचा मृत्यू झाल्याचं त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात स्पष्ट केलंय. त्याच्या अकस्मात निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. रविवारी गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियममध्ये हजारो चाहते झुबीनच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. हजारो चाहते सकाळपासूनच सरुसजाई स्टेडियममध्ये गर्दी करत होते. काहींनी रात्रभर स्डेटियमच्या बाहेरच तळ ठोकला होता. चौथ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी झुबीन सिंगापूरला गेला होता. 20 सप्टेंबर रोजी त्याचा परफॉर्मन्स होता. झुबीनच्या निधनानंतर फेस्टिव्हल रद्द करण्यात आला.
A sea of humanity, united in according a farewell to their favourite son.
He lived like a king, he is being sent to the heavens like one.#BelovedZubeen pic.twitter.com/Hcu3LcJKQp
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 21, 2025
रविवारी आसाम मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात झुबीनसाठी एक मिनिट मौन पाळण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की गुवाहाटीजवळील एका गावात झुबीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 23 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना झुबीनची पत्नी गरिमाने सांगितलं की, तो इतर सात-आठ लोकांसोबत एकाच जहाजाने सिंगापूरच्या एका बेटावर गेले होते. यावेळी त्याच्यासोबत ड्रमर शेखर आणि सिद्धार्थसुद्धा उपस्थित होते. ग्रुपमधल्या सर्व सदस्यांनी लाइफ जॅकेट्स घातले होते. परंतु जेव्हा झुबीन पुन्हा पोहायला गेला, तेव्हा त्याला झटका आला. गरिमा म्हणाली, “ते सर्वजण एकत्र पोहत होते. त्यानंतर ते याचवरून किनाऱ्यावर आले होते. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातलं होतं. परंतु झुबीन पुन्हा पोहायला गेला आणि त्याचवेळी त्याला झटका आला.”
