कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राने घेतली बिपाशा, नेहाची नावं

Raj Kundra : 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आता राज कुंद्राने बॉलिवूडमधल्या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं घेतली आहेत. चौकशीदरम्यान त्याने बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांची नावं घेतली आहेत. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राने घेतली बिपाशा, नेहाची नावं
Bipasha Basu, Raj Kundra and Neha Dhupia
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2025 | 8:35 AM

Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्राने 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आता अभिनेत्री बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांची नावं घेतली आहेत. 60 कोटी रुपयांपैकी काही रक्कम या दोघींना त्यांची फी म्हणून देण्यात आल्याचा खुलासा त्याने चौकशीदरम्यान केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) राजची पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्याने बिपाशा आणि नेहाला दिलेल्या पैशांचा उल्लेख केला. परंतु संपूर्ण चौकशीदरम्यान तो बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगून होता. त्यामुळे संशय वाढल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याची आणखी चौकशी केली जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांना असंही आढळून आलं आहे की कंपनीच्या खात्यांमधून शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू आणि नेहा धुपियासह चार अभिनेत्रींच्या खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतरित करण्यात आला होता. याशिवाय बालाजी एंटरटेन्मेंटसोबत काही व्यवहार झाले का, याचाही शोध घेण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने जवळपास 25 कोटी रुपयांच्या थेट हस्तांतरणाचा मागोवा घेतला आहे.

चौकशीत पुढे असंही दिसून आलं की नोटाबंदीच्या काळात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर रोख रकमेच्या तुटवड्याचा परिणाम झाला होता. त्यादरम्यान इतर खात्यांमध्ये काही संशयास्पद निधी हस्तांतरण केले गेले होते. पैशांच्या या ट्रान्सफरचे पुरावे आता EOW ला मिळाले आहेत. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अधिकाऱ्यांचा तपास सुरूच असून राज कुंद्राला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. याप्रकरणात आणखी काही नावं समोर येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत EOW या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींनाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ऑगस्टमध्ये शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडडे संचालक दीपक कोठारी यांनी ही तक्रार दाखल केली होती. 2015 ते 2023 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडल्याचा दावा संबंधित व्यावसायिकाने केला. शिल्पा आणि राजने त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, परंतु त्याऐवजी त्यांनी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरलं, असा आरोप कोठारी यांनी केला.