Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने करून दाखवलं! आता ‘सैराट’लाही टाकणार मागे
'राजा शिवाजी' हा अभिनेता रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं आहे. गेल्या 17 दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर हळूहळू पुढे जात आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता थिएटरमध्ये 18 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही प्रेक्षकांकडून या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळतोय. जबरदस्त ओपनिंगनंतर पहिल्या दोन आठवड्यांतही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाली. यादरम्यान इतर काही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले तरी, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे. आता प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. विशेषकरून मराठी भाषेत अजूनही या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. हिंदीत ‘पती पत्नी और वो दो’ आणि ‘भूत बंगला’सह इतर काही चित्रपटांकडून टक्कर असतानाही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करतोय.
- ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपयांची कमाई केली होती.
- दुसऱ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 24.30 कोटी रुपये इतका होता.
- प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशी 1.45 कोटी रुपये आणि 16 व्या दिवशी 2.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
- सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 3.05 कोटी रुपये कमावले आहेत.
- ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 84.15 कोटी रुपये झाली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 दिवसांत 85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच नागराज मंजुळे दिग्दर्शिक ‘सैराट’चा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. यासाठी या चित्रपटाला फक्त आणखी सहा कोटी रुपयांची गरज आहे. असं झाल्यास ‘राजा शिवाजी’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरेल. यानंतर बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट बनण्याचं या चित्रपटाचं ध्येय असेल.
भारतात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 मराठी चित्रपट (कोईमोई वेबसाइटच्या डेटानुसार)
- सैराट- 90 कोटी रुपये
- राजा शिवाजी- 85 कोटी रुपये (17 दिवस)
- बाईपण भारी देवा- 76.28 कोटी रुपये
- वेड- 61.2 कोटी रुपये
- नटसम्राट- 42 कोटी रुपये
- पावनखिंड- 37.72 कोटी रुपये
- लय भारी- 37 कोटी रुपये
- कट्यार काळजात घुसली- 35 कोटी रुपये
- ठाकरे- 31.6 कोटी रुपये
- टाइमपास- 30 कोटी रुपये