हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर राकेश रोशन पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, “जे झालं ते..”

राकेश रोशन हे पहिल्यांदाच त्यांचा मुलगा हृतिक रोशनच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. लग्नाच्या 14 वर्षांनंतर हृतिक आणि सुझान विभक्त झाले होते.

हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर राकेश रोशन पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, जे झालं ते..
Rakesh and Hrithik Roshan with Sussanne Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2025 | 11:45 AM

अभिनेता हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच बालमैत्रीण सुझान खानशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं असून विभक्त झाल्यानंतर दोघं मिळून मुलांचं संगोपन करत आहेत. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले असले तरी एकमेकांप्रती दोघांच्याही मनात आदराची भावना असल्याचं स्पष्ट दिसून येतं. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय, तर सुझान ही अर्सलान गोणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे चौघं अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसून येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिकचे वडील राकेश रोशन यांना मुलाच्या घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना, “सुझान ही आजसुद्धा आमच्या घराचा एक भाग आहे”, असं ते म्हणाले.

“जे काही झालं, ते त्या दोघांमध्ये झालं. माझ्यासाठी सुझान ही सुझानच आहे. ते दोघं प्रेमात पडले, त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्यांनाच त्यांचे वाद मिटवायचे आहेत. आमच्यासाठी, सुझान आमच्या घरात सून म्हणून आली होती आणि आताही ती आमच्या कुटुंबाची एक सदस्य आहे”, असं राकेश रोशन यांनी स्पष्ट केलं. घटस्फोटानंतर हृतिक किंवा सुझान कधीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त झाले नाहीत. या दोघांचा घटस्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याबद्दलची माहिती कधीच समोर आली नाही. मात्र हे दोघं सध्या आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेल्याचं पहायला मिळतं. हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान या चौघांमध्ये चांगली मैत्री आहे.

हृतिकने कधी त्याच्या रिलेशनशिप्सबद्दल तुमच्याशी संवाद साधला का, असा प्रश्न राकेश यांना या मुलाखतीत विचारण्याथ आला. त्यावर ते पुढे म्हणाले, “हृतिक आणि माझी मुलगी मला जरा घाबरतात. माहीत नाही का, पण कदाचित मी अधिक शिस्तप्रिय असल्याने ते घाबरत असावेत. माझा स्वभाव तापट नाही किंवा मी उगाच कोणावरही ओरडत, रागावत नाही. पण मी खूप शिस्तप्रिय आहे. ते जेव्हा लहान होते, तेव्हा कधीच मोकळेपणे बोलले नाहीत. पण आता आमच्यात चांगला संवाद होतो. आता घरी आम्ही एकमेकांसोबत मित्रमैत्रिणींसारखे वागतो.”