‘रामायण’च्या स्क्रीनिंगमध्ये रणबीर कपूरकडून मोठी चूक? कॅमेऱ्यासमोर दिला स्वतःचा नंबर? व्हिडिओ चर्चेत
'रामायण' च्या प्रीमिअर दरम्यान रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या क्लिपमध्ये रणबीर, त्याची जुनी को-स्टार पूर्णा जगन्नाथसोबत दिसला. दोघं बोलत असतानाच पूर्णाने त्याच्याकडे काहीतरी मागितलं आणि रणबीरने फोनमध्ये काही टाईप करायला सुरूवात केली. त्याने चुकून कॅमेऱ्यासमोर त्याचा पर्सनल नंबर दाखवला, तो लीक झाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कधी फिल्ममधील त्याच्या लूकबद्दल बोललं जातं, तर कधी यशसोबत त्याच्या बाँडिंगबद्दल चर्चा होते. याच दरम्यान लॉस अँजिलिस येथे फिल्मच्या स्क्रीनिंग दरम्यान असं काही घडलं, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या रणबीरचा एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो, ज्यामुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्चा देखील सुरू आहे. रणबीरने चुकून कॅमेऱ्यासमोरच आपला पर्सनल मोबाईल नंबर लीक केला, असा दावा या व्हिडीओमध्ये केला जात आहे.
खरंतर, लॉस अँजिलिसमधील प्रीमियरदरम्यान रणबीर कपूर हा त्याची जुनी सहकलाकार पूर्णा जगन्नाथन हिच्याशी गप्पा मारताना दिसला. याच वेळी पूर्णाने रणबीरकडे अशी काही मागणी केली की, स्वतःचा फोन काढण्याऐवजी रणबीर तिच्याच मोबाईलमध्ये काहीतरी टाइप करू लागला. इथूनच या घटनेची चर्चा सुरू झाली.
काय आहे त्या व्हिडीओत ?
रेड कार्पेटवरून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर हा ‘ये जवानी है दिवानी’ या गाजलेल्या चित्रपटातील त्याची सहकलाकार पूर्णा जगन्नाथन हिच्याषी गप्पा मारताना दिसला. बऱ्याच काळानंतर भेटलेल्या या दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि गप्पा मारल्या. याचदरम्यान पूर्णाने रणबीर यांच्याकडे त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि स्वतःचा फोन त्याच्या हातात दिला. रणबीरनेही कोणताही संकोच न करता तिचा फोन हातात घेतला आणि त्यामध्ये आपला नंबर टाइप केल्याचं दिसतं. पापाराझींच्या कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रसंग कैद झाला.
रणबीरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. रणबीरचा मोबाईल नंबर खरोखरच कॅमेऱ्यात कैद झाला का, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र, कॅमेरा दूर असल्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवरील मजकूर आणि नंबर स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
‘रामायण’चा भव्य प्रीमिअर आणि हॉलीवूडचे पाहुणे
लॉस अँजिलिसमध्ये ‘रामायण’ फिल्मचं स्क्रीनिंग झालं तेव्हा मेन स्टारकास्टपैकी रणबीर कपूर, साई पल्लवी आणि ‘केजीएफ’ फेम यश तिथे पोहोचला होता. त्यांच्यासोबत दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्राही उपस्थित होते. भव्य ‘डेव्हिड गेफेन थिएटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या 3D स्क्रीनिंगला अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. हॉलिवूड स्टार जेडा पिंकेट स्मिथ, बेन्जी केली, रोहिणी अय्यर आणि गिसेला मोंटेगो यांसारख्या नामवंत व्यक्तीही यावेळी उपस्थित होत्या.