Ramayana: आदिनाथ कोठारेच्या चित्रपटाने मोडला विक्रम, परदेशात रचला इतिहास; ‘धुरंधर 2’लाही टाकलं मागे
Ramayana: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ने परदेशातील कमाईत ‘धुरंधर 2’ला मागे टाकलं आहे. हा चित्रपट ओव्हरसीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Ramayana: अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच आहे. भारतात दमदार कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाने परदेशातही मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमध्ये कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ला मागे टाकलं आहे. यासह परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून ‘रामायण’ने पहिलं स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही आठवडे झाले असतानाही त्याची कमाई सुरूच आहे.
ओव्हरसीजमध्ये 490 कोटींची कमाई
बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आतापर्यंत 59 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे 490 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याआधी हा विक्रम रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ अर्थात ‘धुरंधर 2’च्या नावावर होता. या चित्रपटाने परदेशात सुमारे 475.93 कोटी रुपये म्हणजेच 51 मिलियन डॉलरची कमाई केली होती. आता ‘रामायण’ने हा आकडा पार करत अव्वल स्थान मिळवलं आहे.
नॉर्थ अमेरिकेतही ‘रामायण’चा दबदबा
‘रामायण’साठी नॉर्थ अमेरिका ही सर्वात मोठी परदेशी बाजारपेठ ठरली आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये मिळून चित्रपटाने अंदाजे 28.4 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ‘धुरंधर 2’ची या बाजारपेठेतील कमाई सुमारे 28 मिलियन डॉलर होती. त्यामुळे नॉर्थ अमेरिकेतही ‘रामायण’ने हा विक्रम मागे टाकला आहे.
थायलंड, नेपाळ, इंडोनेशियातही कमाईचा धडाका
केवळ अमेरिका आणि कॅनडाच नव्हे, तर इतर देशांमध्येही ‘रामायण’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थायलंडमध्ये 1.9 मिलियन डॉलर, नेपाळमध्ये 1.5 मिलियन डॉलर आणि इंडोनेशियामध्ये 1.2 मिलियन डॉलरची कमाई झाली आहे. याशिवाय ब्रिटनमध्ये 6.5 मिलियन डॉलर, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 5.4 मिलियन डॉलर आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5.1 मिलियन डॉलरचा व्यवसाय चित्रपटाने केला आहे. मलेशिया आणि जर्मनीमध्येही चित्रपटाची कमाई समाधानकारक असल्याचं वृत्त आहे.
अजूनही अनेक देशांमध्ये प्रदर्शनाची तयारी
‘रामायण’चा आंतरराष्ट्रीय प्रवास अद्याप संपलेला नाही. चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह आणखी काही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. या देशांमध्ये प्रदर्शन झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओव्हरसीजमधील हा विक्रम किती पुढे जातो, याकडे चित्रपट व्यापार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे ‘रामायण’ने परदेशात कमाईचा नवा विक्रम केला असला, तरी चित्रपटाच्या बजेटचा विचार करता निर्मात्यांसमोर अजूनही मोठं आव्हान आहे. या चित्रपटाचं प्रोडक्शन बजेट तब्बल 200 मिलियन अमेरिकन डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे. एवढ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाला खर्च वसूल करण्यासाठी साधारणपणे बजेटच्या दुप्पट कमाई करावी लागते, असं इंडस्ट्रीतील अंदाज सांगतात. त्यामुळे सध्या मिळालेलं यश मोठं असलं, तरी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे.
