Ramayana: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ला मोठा झटका; थेट कमाईवर होणार परिणाम
Ramayana: रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने जगभरात 150 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. मात्र, तरी तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या तिकीट विक्रीत घट झाल्याने तब्बल 800 थिएटर्समधून चित्रपटाचे शोज कमी करण्यात आले आहेत.

Ramayana: बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 150 मिलियन (दशलक्ष) अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक कमाईचा टप्पा पार केला आहे. मात्र, एकीकडे कोट्यवधींची कमाई होत असताना दुसरीकडे अमेरिकेत चित्रपटाच्या स्क्रीन्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. तिसऱ्या आठवड्यात तिकीट विक्रीत झालेल्या घसरणीचा चित्रपटाला फटका बसला आहे.
800 थिएटर्समधून शोज कमी होणार?
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अमेरिकेत सुरुवातीला आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ 1400 हून अधिक थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यातच चित्रपटाचे 300 हून अधिक स्क्रीन्स कमी करण्यात आले. आता शुक्रवारपासून अमेरिकेतील थिएटर्सची संख्या 681 पर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच सुरुवातीच्या प्रदर्शनाच्या तुलनेत 700 हून अधिक थिएटर्सची संख्या कमी होणार आहे. तिकीट विक्रीत झालेली घट आणि बॉक्स ऑफिसवरील कमाईचा वेग मंदावल्याने हा निर्णय घेतला जात असल्याचं वृत्त आहे.
150 मिलियन डॉलरची कमाई, तरीही खर्च वसूल करण्याचं आव्हान
‘रामायण’ने जगभरात 150 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली असली, तरी चित्रपटाच्या बजेटचा विचार करता निर्मात्यांसमोर मोठं आव्हान आहे. या चित्रपटाचं निर्मिती बजेट जवळपास 200 मिलियन डॉलर असल्याचं वृत्त आहे. एवढ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाला खर्च वसूल करण्यासाठी त्यापेक्षा कितीतरी अधिक कमाई करावी लागते. चित्रपटाच्या दोन भागांचं एकत्रित बजेट 400 मिलियन डॉलरपेक्षा जास्त असल्याची माहिती निर्माते नमित मल्होत्रा यांनी दिल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
‘आरआरआर’लाही टाकलं मागे
दरम्यान, अमेरिकेतील थिएटर्सची संख्या कमी होत असली, तरी ‘रामायण’ने जागतिक स्तरावर काही महत्त्वाचे विक्रम केले आहेत. या चित्रपटाने 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’च्या कमाईला मागे टाकलं आहे. अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे थिएटर्सची संख्या कमी होण्याची बातमी समोर आली असली, तरी चित्रपटाची एकूण कमाई आणि त्याचा जागतिक प्रभाव याकडेही लक्ष लागलं आहे.
