Ramayana: कमाईतून 4000 वसूल झाले नाही तर थेट..; आदिनाथ कोठारेच्या चित्रपटाचे निर्माते स्पष्टच बोलले..
Ramayana: रणबीर कपूर रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या आणि यश रावणाच्या भूमिकेत असलेल्या 'रामायण'च्या पहिल्या भागाने प्रदर्शनानंतर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत जगभरात 663 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचं वृत्त आहे.

Ramayana: रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या भव्यतेसोबतच त्याच्या बजेटचीही मोठी चर्चा आहे. तब्बल 500 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 4680 कोटी रुपये इतका या दोन भागांच्या चित्रपटाचा खर्च असल्याचं समोर आलं आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर हा पैसा कसा वसूल होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चित्रपटातून पैसे मिळाले नाहीत, तर नेमकं काय करायचं, याचा मास्टरप्लॅन त्यांनी सांगितला आहे.
नमित मल्होत्रा यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’च्या कमाईच्या नियोजनाबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले की, आम्ही केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचा विचार करून हा चित्रपट बनवलेला नाही. चित्रपटातून अपेक्षित कमाई झाली नाही, तर मर्चेंडाइजमधून पैसे कमावता येतील. तिथूनही कमाई झाली नाही, तर थीम पार्क उभारण्याचा पर्याय आहे. त्यातूनही नाही झालं, तर कमाईचे अन्य मार्ग शोधले जातील. ‘ही प्रभू रामांची कथा आहे. लोकांना हा चित्रपट आवडला आणि त्याच्याशी जोडले गेले, तर त्यातून आर्थिक फायदा होणारच,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘रामायण’मध्ये यशच्या मॉनस्टर माईंड क्रिएशन्स या कंपनीची सहनिर्मिती असली, तरी या दोन भागांच्या चित्रपटासाठी केलेली संपूर्ण गुंतवणूक आणि त्यातील आर्थिक जोखीम आपलीच असल्याचे नमित यांनी स्पष्ट केलं आहे. चित्रपटासाठी अत्याधुनिक व्हीएफएक्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि कलाकारांवर मोठा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नमित यांची कंपनी DNEG ही आठ ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी आहे. याशिवाय हॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर आणि ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी इंग्रजीसह परदेशी भाषांमध्ये लिप-सिंक करण्यासाठी ‘ब्रह्मा एआय’ या तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या बजेटवरून होणाऱ्या चर्चेबाबत सहनिर्माता यशनेही प्रतिक्रिया दिली होती. ‘आपण परदेशात चित्रपट प्रमोट करताना कमी बजेटचा चित्रपट बनवला आहे, असं सांगितल्यास त्याला अपेक्षित महत्त्व मिळणार नाही. भारताची क्षमता आणि आपण काय करू शकतो, हे जगाला दाखवणं गरजेचं आहे,’ असं यशने म्हटलं होतं. विशेष म्हणजे, 4000 कोटींपेक्षा अधिक असलेल्या बजेटमध्ये दोन्ही भागांच्या आंतरराष्ट्रीय मार्केटिंग खर्चाचाही समावेश असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.