Ramayana: हे सर्व AI नाही, लोकांना समजतच नाही..; ‘रामायण’च्या VFX वरील टीकेवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला

Ramayana: 'रामायण' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील व्हीएफएक्सवरून टीका करणाऱ्यांना आता अभिनेता रणबीर कपूरने उत्तर दिलं आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्सबद्दल तो काय म्हणाला, ते जाणून घ्या..

Ramayana: हे सर्व AI नाही, लोकांना समजतच नाही..; रामायणच्या VFX वरील टीकेवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला
Ranbir Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 9:20 AM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्सवर सोशल मीडियावर टीका झाली. आता या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर आणि निर्माते नमित मल्होत्रा हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच अमेरिकेला गेले होते. तब्बल 4000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट इतक्या भव्यतेनं कसा साकारला, याविषयी त्यांनी तिथे मोकळेपणे सांगितलं.

कोलाइडरसोबतच्या एका मुलाखतीत टीमने चित्रपटाच्या प्रगतीवर चर्चा केली आणि सोशल मीडियावर होणाऱ्या टीकांना उत्तरसुद्धा दिलं. रामायण हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिल्या भागाविषयी दिग्दर्शक म्हणाले, “आमचं काम जवळपास पूर्ण झालं आहे, एडिट लॉक झालेलं आहे. आता व्हीएफएक्सचं कामसुद्धा अखेरच्या टप्प्यात आलं आहे. हेच सर्वांत कठीण काम होतं. जेव्हा तुम्ही हा चित्रपट पहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की फक्त VFX योग्य करण्यासाठी किती मेहनत घेण्यात आली आहे.”

काय म्हणाला रणबीर कपूर?

व्हिज्युअल इफेक्ट्सच्या टीकेवर रणबीर म्हणाला, “सीजीआय म्हणजेच कंप्युटर जनरेटेड इमेजरी कसं केलं जातं हे लोकांना माहीतच नाही. लोकांना असं वाटतं की काहींनी फक्त एआयचा वापर केला आणि काहीतरी रिलीज केलं. यात असंख्य तासांची मेहनत घेण्यात आली आहे. कलाकार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मी नितेश सर किंवा नमित यांना हा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर व्हिएफएक्स कॉल्सवर बसताना पाहिलं आहे. आकाशाच्या एखाद्या खास रंगालाही ठीक करण्यासाठी ते कित्येक तास मेहनत घ्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की आता खऱ्या सीजीआयने प्रेक्षकांना प्रभावित करणं कठीण आहे.”

याविषयी निर्माते नमित मल्होत्रा म्हणाले, “आम्ही मोठ्या पडद्यावरील या भव्य अनुभवासाठी कोट्यवधी डॉलर खर्च करत आहोत आणि जेव्हा तुम्ही खराब इंटरनेट कनेक्शनच्या फोनवर पाहून टीका करता, तेव्हा वाईट वाटतं. आम्ही जे करू शकतो, ते करतोय. आम्ही अनेक क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सनाही चित्रपटाविषयी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून तेसुद्धा चित्रपटाचं योग्य मूल्यांकन करू शकतील.”

चित्रपटाच्या ट्रोलिंगबद्दल दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली. “दु:खद बाब ही आहे की जर कोणी चुका शोधण्यावरच ठाम असेल, तर तुम्ही केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांकडे दुर्लक्षच केलं जाईल. तुमच्या लहानशा चुकीलाही मोठं करून दाखवलं जाईल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us