Rani Mukerji mother: राणी मुखर्जीच्या करिअरला दिली दिशा, अनेक गाण्यांना दिला आवाज; कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाने लेकीने गमावला आईचा आधार
राणी मुखर्जी स्वतः तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी चर्चा करत नाही. त्यामुळे आईच्या निधनाच्या या दुःखद प्रसंगीही कुटुंबाने शांतता आणि खासगीपणाला प्राधान्य दिलं आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर राणी आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाने मुखर्जी कुटुंबाने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आधार गमावला आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणीची आई आणि माजी पार्श्वगायिका कृष्णा मुखर्जी यांचं आज (22 सप्टेंबर 2026) रोजी दुपारी निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती कुटुंबाच्या वतीने देण्यात आली असून, या कठीण काळात कुटुंबीयांनी खासगीपणाचा आदर करण्याची विनंती केली आहे. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कृष्णा मुखर्जी यांचा संबंध केवळ राणी मुखर्जीच्या आई म्हणून नव्हता, तर त्या स्वतःही संगीत आणि चित्रपट क्षेत्राशी जोडलेल्या होत्या. त्या माजी पार्श्वगायिका होत्या. राणीच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिच्या आईचा मोठा प्रभाव होता. 2026 मध्ये राणीने तिच्या तीन दशकांच्या चित्रपट प्रवासाबद्दल बोलताना आपल्या आई-वडिलांचा आणि कुटुंबाच्या संस्कारांचा उल्लेख केला होता.
कृष्णा मुखर्जी यांचा कुटुंबाला मोठा आधार
राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते होते. त्यांनी ‘हम हिंदुस्तानी’ आणि ‘लीडर’ यांसारख्या चित्रपटांशी काम केलं होतं. 2017 मध्ये राम मुखर्जी यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर कृष्णा मुखर्जी यांनी कुटुंबाला मोठा आधार दिला होता. राणीच्या अभिनय प्रवासाच्या सुरुवातीपासूनच तिच्या आई-वडिलांचा प्रभाव राहिला. राणीने 1996 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि पुढे ‘गुलाम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथिया’, ‘ब्लॅक’, ‘हम तुम’, ‘मर्दानी’ यांसारख्या चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
प्लेबॅक सिंगर
कृष्णा मुखर्जी यांनी 1980च्या दशकात अनेक लोकप्रिय गाण्यांना आपला आवाज दिला होता. त्यांचं सर्वात प्रसिद्ध गाणं म्हणजे 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीसरी आंख’ चित्रपटातील ‘ईद के दिन गले मिल ले राजा’. हे गाणं प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं. संगीत क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे कृष्णा मुखर्जी यांची शास्त्रीय आणि लोकसंगीतावर चांगली पकड होती. चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिंग करण्यासोबतच त्या अनेक बंगाली अल्बम आणि स्टेज शोच्या माध्यमातूनही संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या.
संगीत क्षेत्रातील कारकिर्दीसोबतच कृष्णा मुखर्जी यांना चित्रपटसृष्टीतील कामकाज आणि व्यवसायाचीही उत्तम जाण होती. त्यांनीच राणी मुखर्जीला चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कामाच्या गुणवत्तेबाबत त्या अतिशय काटेकोर होत्या. राणीच्या पहिल्या स्क्रीन टेस्टच्या वेळी मुलीचा अभिनय त्यांना पसंत पडला नाही. त्यामुळे त्यांनी ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटाचे निर्माते सलीम यांच्याशी स्पष्टपणे बोलत राणीला चित्रपटात घेऊ नका, असं सांगितलं होतं. राणीचा अभिनय अपेक्षेप्रमाणे न झाल्यास निर्मात्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं, अशी त्यांची भूमिका होती.
राणीने आपल्या करिअरची सुरुवात केल्यापासून ती जेव्हा-जेव्हा कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला, चित्रपटाच्या स्क्रीनिंगला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला जायची, तेव्हा कृष्णा मुखर्जी तिच्यासोबत आवर्जून दिसायच्या. पती राम मुखर्जी यांच्या निधनानंतरही कृष्णा या आपल्या मुलगी राणीसोबत राहत होत्या आणि कुटुंबासाठी खंबीर आधाराची भूमिका बजावत होत्या.