
अभिनेत्री दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर इंडस्ट्रीतून त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आधी कोरिओग्राफर फराह खानने त्यावरून टिप्पणी केली होती आणि त्यामुळे दीपिकासोबत तिचे वाद सुरू झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीनेही या मागणीवर आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या काहींनी दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचं समर्थन केलंय, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. या मागणीबद्दल बोलताना राणीने स्वत:चा अनुभव सांगितला. ‘हिचकी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तिची मुलगी आदिरा चौदा महिन्यांची होती. तिचं स्तनपान आणि शूटिंग या दोन्ही गोष्टी सांभाळणं तारेवरची कसरतच होती, असं राणीने सांगितलं.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, “मी जेव्हा ‘हिचकी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती, तेव्हा आदिरा फक्त 14 महिन्यांची होती. मी त्यावेळी स्तनपान करत होते, म्हणून मला सकाळी शूटिंगसाठी निघण्यापूर्वी तिच्यासाठी दूध पंप करावं लागायचं. माझ्या घरापासून जुहू परिसरातील शूटिंगच्या सेटवर पोहोचण्यासाठी मला जवळपास दोन तास लागायचे. त्यामुळे सकाळी मुलीसाठी दूध पंप करून 6.30 वाजता मी शूटिंगसाठी निघायचे. माझा पहिला शॉट सकाळी 8 वाजता असायचा. माझ्या युनिट आणि दिग्दर्शकांनी इतकं नियोजन केलं होतं की मी 6 ते 7 तासांत शूटिंग पूर्ण करायचे आणि शहरातील ट्रॅफिक वाढण्याआधीच दुपारी 3 वाजता घरी पोहोचायचे. अशा प्रकारे मी तो चित्रपट पूर्ण केला होता.”
आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीबद्दल राणी पुढे म्हणाली, “हल्ली लोक याबद्दल उघडपणे बोलत आहेत, म्हणून त्याची इतकी चर्चा होत आहे. परंतु हे सगळ्याच कामाच्या ठिकाणी होतं. फक्त अभिनयक्षेत्रातील हा प्रश्न नाही. जर निर्मात्यांना काही समस्या नसेल, तर तुम्ही काही तासांत शूटिंग पूर्ण करून निघू शकता. परंतु जर निर्मात्यांना ते पटत नसेल तर तुम्हाला चित्रपटाच्या बाहेर काढलं जातं. त्यामुळे कोणीही तुमच्यावर काहीही थोपत नाहीये.”
दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर त्याची बॉलिवूड इंडस्ट्रीत अधिक चर्चा होऊ लागली आहे. याच मागणीमुळे तिने ‘स्पिरीट’ या चित्रपटातून माघार घेतल्याचं म्हटलं गेलं. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत काम करणार होती.