पॉर्नस्टारसोबत रणवीरच्या जाहिरातीवर भडकली रश्मी देसाई; म्हणाली ‘हा चपराक..’

अभिनेता रणवीर सिंहची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या जाहिरातीत तो जॉनी सिन्ससोबत काम करताना दिसतोय. या जाहिरातीवर टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही जाहिरात म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीसाठी चपराक असल्याचं तिने म्हटलंय.

पॉर्नस्टारसोबत रणवीरच्या जाहिरातीवर भडकली रश्मी देसाई; म्हणाली हा चपराक..
रणवीर सिंगच्या जाहिरातीवर भडकली रश्मी देसाई
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2024 | 1:35 PM

मुंबई : 13 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रणवीर सिंह आणि जॉनी सिन्स यांची नवी जाहिरात सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन (नपुंसकता) या विषयावरील या जाहिरातीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या जाहिरातीला एका मालिकेच्या स्टाइलमध्ये शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे एका अर्थाने मालिकांची आणि टीव्ही इंडस्ट्रीची खिल्ली उडवल्याची तक्रार अभिनेत्री रश्मी देसाईने केली आहे. रश्मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करतेय. ही जाहिरात अत्यंत अपमानकारक असल्याची भावना तिने बोलून दाखवली. याविषयी तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

रश्मी देसाईची पोस्ट-

‘हे सर्वांत अनपेक्षित कोलॅबरेशन आहे. मी स्थानिक फिल्म इंडस्ट्रीतून माझ्या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोक त्याला छोटा पडदा असंही म्हणतात. जिथे सर्वसामान्य लोक बातम्या, क्रिकेट आणि सर्व बॉलिवूड चित्रपटांसह बरंच काही पाहतात. आता ही सर्वांत अनपेक्षित रिल पाहिल्यानंतर मला त्यातून टीव्ही इंडस्ट्रीचा आणि टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्यांचा अपमान केल्याचं जाणवतंय. कारण आम्हाला नेहमीच कमी लेखलं जातं आणि तशीच वागणूक दिली जाते. कलाकारांना खरंच मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा असते, पण आम्हाला अशी वागणूक मिळते. प्रत्येकजण खूप मेहनतीने काम करतो. पण मला माफ करा टीव्ही शोजमध्ये हे असं सर्व काही दाखवलं जात नाही. हे सर्व मोठ्या पडद्यावर होतं’, असं तिने लिहिलंय.

यापुढे रश्मीने म्हटलंय, ‘खरं दाखवणं चुकीचं नाही पण ही जाहिरात टीव्ही इंडस्ट्रीसाठी चपराक आहे. कदाचित मी गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया देत असेन पण आम्ही आमच्या प्रेक्षकांना संस्कृती आणि प्रेम दाखवतो. मला वाईट वाटतंय कारण टीव्ही इंडस्ट्रीतील माझा प्रवास माझ्यासाठी फार सन्मानकारक आहे. तुम्ही माझ्या भावनांना समजून घ्याल अशी अपेक्षा करते.’

पहा व्हिडीओ

रणवीरने एका मेन्स सेक्शुअल हेल्थ केअर कंपनीसाठी ही जाहिरात केली आहे. या जाहिरातीत त्याने पॉर्न स्टार जॉनी सिन्ससोबत काम केलंय. छोट्या पडद्यावरील सासू-सुनांच्या मालिकांच्या संकल्पनेवर आधारित या जाहिरातीचं शूटिंग करण्यात आलं आहे. म्हणूनच रश्मी देसाईने संताप व्यक्त केला आहे.