रणवीर-दीपिकाने वरळीतल्या या सर्वसामान्य रेस्टॉरंटमध्ये जेवून साजरा केला ‘धुरंधर 2’च्या यशाचा आनंद

'धुरंधर 2' या चित्रपटाविषयी आणि त्यातील रणवीरच्या कामगिरीविषयी दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नाही किंवा कुठेही प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून अनेकजण तिला ट्रोल करत होते.

रणवीर-दीपिकाने वरळीतल्या या सर्वसामान्य रेस्टॉरंटमध्ये जेवून साजरा केला धुरंधर 2च्या यशाचा आनंद
Ranveer Singh and Deepika Padukone
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 10:38 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या फक्त चार दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील रणवीर सिंहच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट लिहिल्या आहेत. यादरम्यान रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल चकार शब्द न काढल्याने काही चाहते नाराज झाले होते. काहींनी तिला यासाठी ट्रोलसुद्धा केलं. इतकंच नव्हे तर दीपिका आणि रणवीर यांच्यात काही बिनसलं की काय, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण नुकतंच दीपिका आणि रणवीरला एकत्र पाहिलं गेलं आहे.

मुंबईतील एका सर्वसामान्य रेस्टॉरंटमध्ये हे दोघं लंच डेटला गेले होते. या रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरळीत हे सीफूड रेस्टॉरंट असून ‘मासळी’ असं त्याचं नाव आहे. दीपिकाला मासे खूप आवडतात. त्यामुळे ‘धुरंधर 2’चा यश साजरा करण्यासाठी हे दोघं त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. त्याठिकाणी दोघांनीही माशांवर ताव मारला. लंच डेटनंतर जेव्हा हे दोघं रेस्टॉरंटबाहेर पडले, तेव्हा चाहत्यांनी तिथे गर्दी केली होती. आधी दीपिका तिथून बाहेर आली आणि तिच्या कारमध्ये जाऊन बसली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यानंतर रणवीर चाहत्यांना अभिवादन करत पुढे आला. रेस्टॉरंटबाहेर जमलेल्या चाहत्यांनी रणवीरसमोर ‘बब्बर शेर’च्या घोषणा केल्या. त्यांच्याशी हात मिळवत नंतर तोसुद्धा गाडीमध्ये जाऊन बसला.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘या दोघांचा साधेपणाच खूप आवडतो’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘दीपिकाला रणवीरवर किती अभिमान आहे, हे तिच्या चेहऱ्यावरील हास्यावरून स्पष्ट दिसतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘धुरंधर 2’वर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्लू अर्जुन, आलिया भट्ट, महेश बाबू, राम चरण, राम गोपाल वर्मा, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत.

Follow Us