रणवीरने लाइव्ह शोमध्ये ठरवलं होतं बाळाचं नाव; जाणून घ्या कोणतं? आता मुलीचं नाव काय ठेवणार?

रणवीर सिंहने एका शोमध्ये बाळाच्या नावाचा खुलासा केला होता. आता मुलगी झाल्यानंतर रणवीर तिचं नाव काय ठेवणार, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दोघं आई-बाबा झाले आहेत.

रणवीरने लाइव्ह शोमध्ये ठरवलं होतं बाळाचं नाव; जाणून घ्या कोणतं? आता मुलीचं नाव काय ठेवणार?
रणवीर सिंह, दीपिका पादुकोण
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2024 | 3:05 PM

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतेच आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने आज 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. गणेशोत्सव काळात रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ही गोड बातमी मिळताच चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिकाला मुलगी झाल्याचं समजताच तिच्याविषयीची प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. रणवीर-दीपिका त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. एका शोमध्ये रणवीरने त्याच्या बाळासाठी काही नावं शॉर्टलिस्ट केल्याचा खुलासा केला होता. ‘द बिग पिक्चर’ या शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीरने हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने बाळाच्या नावाच्या यादीतील एका नावाचाही खुलासा केला होता.

‘द बिग पिक्चर’मध्ये शौर्यवीर नावाच्या एका स्पर्धकाशी बोलताना रणवीर म्हणाला होता, “मी बाळाच्या नावांची यादी शॉर्टलिस्ट करतोय. तुला जर काही समस्या नसेल तर तुझं नाव शौर्यवीर सिंह मी घेऊ शकतो का?” आपल्याला मुलगा झाल्यास त्याचं नाव शौर्यवीर ठेवण्याची रणवीरची इच्छा होती. मात्र आता मुलीचा जन्म झाल्याने रणवीर तिचं नाव काय ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2022 मध्ये ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरला बाळाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुला मुलगा हवा की मुलगी असं त्याला विचारलं गेलं होतं. त्यावर उत्तर देताना रणवीरने सांगितलं होतं की मुलगा किंवा मुलगी कोणीही झालं तरी मला आनंदच होईल. “जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा ते तुम्हाला विचारत नाहीत की तुम्हाला लाडू हवा की शीरा? मंदिरात तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही प्रसाद म्हणून स्वीकारता. माझ्याबाबतीतही हेच आहे”, असं तो म्हणाला होता.

दीपिका आणि रणवीरची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. दीपिकाला पाहताचक्षणी रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. मात्र ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. या दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांनी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. याविषयीचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये केला होता. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांनी साखरपुड्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.