
मुंबईतील मीरा रोड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका रेस्टॉरंटच्या मालकाला मराठीत बोलला नाही म्हणून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकीकडे गुरुवारी शहरातील व्यापारी संघटनांनी दुकानं बंद ठेवत मोर्चा काढला. तर दुसरीकडे मनसेनं आपली भूमिका ठाम ठेवत यावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता यासंदर्भात बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीची पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी न बोलल्याबद्दल गुजराती दुकानदारावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा रणवीरने सोशल मीडियावर तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेवरून संताप व्यक्त करत त्याने मनसे कार्यकर्त्यांची कृती लज्जास्पद असल्याचं म्हटलंय. या पोस्टमध्ये रणवीरने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलंय.
संबंधित दुकानदाराला व्हिडीओ शेअर करत रणवीरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘हे घृणास्पद आहे. राक्षसं मोकाट फिरत आहेत. लक्ष वेधण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी ते असं करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?’ रणवीरच्या या पोस्टवरून काही नेटकऱ्यांनी त्याचं समर्थन केलंय, तर काहींनी त्यालाच प्रतिप्रश्न विचारला आहे. तुम्ही महाराष्ट्रात किती वर्षांपासून राहत आहात, मराठी शिकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले, असा सवाल एका युजरने केला. त्यावर रणवीरनेही उत्तर दिलं आहे.
This is sickening. Monsters on the loose, looking for attention and political relevance. Where’s L&O, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis? https://t.co/sMYUMcN1la
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 2, 2025
‘सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्यासारख्या अनोळखी लोकांना प्रत्युत्तर देणार नाही, जे द्वेष पसरवतात. दुसरं म्हणजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांना मारहाण करून भाषा शिकवता येते, तर तुम्ही खूप चुकीचे आहात आणि शेवटची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं असेल, तर फक्त आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असहाय्य लोकांना मारहाण करण्यापेक्षा इतर मार्ग निवडा. राजकीय फायद्यासाठी निषेध करण्याचे अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्ग आहेत’, असं रणवीरने म्हटलंय.
व्हायरल व्हिडीओत पहायला मिळतंय की रेस्टॉरंटचा मालक म्हणतोय, “मराठीची सक्ती असल्याचं मला माहीत नाही. मला कुणीतरी मराठी भाषा शिकवा, मी मराठीत बोलेन.” त्यावरून मनसेचे तीन कार्यकर्ते त्याच्याशी वाद घातलाना दिसत आहेत. “हा महाराष्ट्र आहे, मग तुला मराठीतच बोलावं लागेल. तू कुठल्या राज्यात व्यवसाय करतोस”, असा प्रश्न एकाने रेस्टॉरंट मालकाला विचारला. त्यानंतर त्यांनी थेट त्याला मारायला सुरुवात केली. विशेष म्हणजे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते त्या रेस्टॉरंट मालकाला हिंदीत बजावून सांगत होते की, मराठी में बोल.