मैत्रिणीच्या निधनाला 4 दिवस झाले नाहीत अन् ही..; रश्मी देसाईच्या ‘त्या’ कृत्यावर भडकले नेटकरी
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाच्या चार दिवसांनंतर रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या काही फोटोंवरून नेटकरी भडकले आहेत. अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. मैत्रिणीच्या निधनाचं दु:ख इतक्या लवकर विसरल्याची टीका नेटकरी करत आहेत.

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस 13’मध्ये तिच्यासोबत स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री आणि खास मैत्रीण रश्मी देसाई तिला अखेरचा निरोप द्यायला अंत्यसंस्काराला पोहोचली होती. परंतु शेफालीच्या निधनाच्या चार दिवसांतच रश्मीने असं काही केलंय, ज्यावरून नेटकरी प्रचंड भडकले आहेत. रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत. हेच फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम अशा कॅज्युअल लूकमध्ये रश्मीने हे फोटोशूट केलंय. यामध्ये ती हसत-हसत आणि काही ग्लॅमरस पोजसुद्धा देताना दिसतेय. तिच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने लिहिलं, ‘दोन दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या निधनाचं दु:ख आणि आता हे सर्व फोटो? शेफाली काय विचार करेल? सगळा दिखावा आहे तुम्हा लोकांचा.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘थोडा तरी विचार करायला हवा होता. मैत्रिणीच्या निधनाला चार दिवस झाले नाहीत आणि इथे असे फोटो पोस्ट करतेय.’ तुला लाज वाटली पाहिजे, अशीही टीका काहींनी केली आहे.
View this post on Instagram
शेफालीचं 27 जून रोजी निधन झालं. रात्री जेवल्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे पती पराग त्यागीने तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफालीचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केलाय की, शेफाली त्यादिवशी सकाळपासून उपाशी होती. त्यानंतर रात्री तिने फ्रीजमधील फ्राइड राइल खाल्लं होतं. त्यावर तिने अँटी एजिंगची औषधं घेतली होती. म्हणूनच तिला हार्ट अटॅक आल्याचं म्हटलं गेलंय. परंतु शेफालीच्या निधनाचं नेमकं कारण हे पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधूनच स्पष्ट होऊ शकेल.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत.
