बॉलिवूडमध्ये फिकी पडतेय ‘श्रीवल्ली’ची जादू? ‘गुडबाय’च्या कमाईतून बजेटचीही वसुली होणं कठीण

| Updated on: Oct 09, 2022 | 3:33 PM

रश्मिका टॉलिवूडमध्ये सुपरस्टार पण बॉलिवूडमध्ये होणार फ्लॉप?

बॉलिवूडमध्ये फिकी पडतेय श्रीवल्लीची जादू? गुडबायच्या कमाईतून बजेटचीही वसुली होणं कठीण
Goodbye movie
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई- अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे नाव आता फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. ‘नॅशनल क्रिश’, ‘एक्स्प्रेशन क्वीन’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गुडबाय’ (Goodbye) या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. 7 ऑक्टोबर रोजी ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रश्मिकाच्या चित्रपटांना जसा प्रतिसाद मिळतो, तसाच प्रतिसाद तिला बॉलिवूडमध्ये मिळताना दिसत नाही. गुडबायच्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा (Box Office Collection) हा अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे.

गुडबाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना, नीना गुप्ता, पावैल गुलाटी, सुनील ग्रोव्हर यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. विविध शहरांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये रश्मिकाने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनदेखील केलं. मात्र याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर फारसा परिणाम दिसला नाही.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त 1.2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशीच्या कमाईतही थोडीफार वाढ दिसली. 8 ऑक्टोबर रोजी गुडबायने 1.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने 2.70 कोटी रुपये कमावले.

हे सुद्धा वाचा

काही रिपोर्ट्सनुसार, गुडबायचा बजेट 30 ते 40 कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनचा मंदावलेला वेग पाहता हा चित्रपट बजेटचीही वसुली करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतोय. जर वीकेंडलाही कमाई चांगली होऊ शकली नाही तर रश्मिकाचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरेल.

कंगनाच्या ‘क्वीन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या विकास बहलने ‘गुडबाय’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘गुडबाय’शिवाय रश्मिका ही सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही झळकणार आहे. त्याचसोबत ‘ॲनिमल’मध्येही ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ फेम संदीप रेड्डी वांगा करणार आहे.