
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: राजस्थानातील उदयपूर शहरात पुन्हा एकदा ग्लॅमर आणि शाही थाटाचा मिलाफ पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला उदयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत दोन्ही कलाकारांच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अरावली पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या आलिशान ITC Mementos Ekaaya Udaipur येथे होणार असल्याची चर्चा आहे. या हॉटेलचे निसर्गरम्य वातावरण, भव्य वास्तुकला आणि राजेशाही थाट यामुळे ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलमधील अनेक खोल्या एकाच वेळी आरक्षित करण्यात आल्या असून लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळी या हॉटेलचा नजारा अधिकच मनमोहक दिसतो. ज्यामुळे शाही विवाहासाठी ते परफेक्ट ठिकाण मानले जाते.
एका रात्रीचे भाडे किती?
हॉटेलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ‘व्हॅली व्ह्यू व्हिला’ प्रकारातील खोलीचे एका रात्रीचे भाडे सुमारे 26 हजार रुपये इतके आहे. सर्वसाधारण पाहुण्यांसाठी हे दर अधिक असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, हॉटेलमध्ये दोन प्रकारचे सूट उपलब्ध आहेत. ‘अरावली सूट’चे एका रात्रीचे भाडे सुमारे 55 हजार रुपये आहे. तर ‘ममेंटोस सूट’चे भाडे 75 हजार ते 88 हजार रुपयांदरम्यान आहे. या दरांवरून या विवाहसोहळ्याची भव्यता सहज लक्षात येते.
ग्रँड वेडिंगसाठी उदयपूर पसंतीचे ठिकाण
उदयपूर हे आधीपासूनच शाही आणि ग्रँड विवाहांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी येथे लग्नसोहळे पार पाडले आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांनी देखील उदयपूरमध्येच विवाह केला होता. तसेच उद्योगपती राजू मंटेना यांच्या कन्या नेत्रा यांच्या लग्नसोहळ्यानेही मोठी चर्चा रंगवली होती.
रश्मिका आणि विजय यांच्या नात्याबाबत मागील काही वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. आता लग्नाच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, या विवाहाबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.