Resham Tipnis : रेशम टिपणीस होती जोडीदाराच्या शोधात, अखेर अभिनेत्रीला मिळाला ‘श्रीमान’, लवकरच…
Resham Tipnis : अभिनेत्री रेशम टिपणीसनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री 'श्रीमान'च्या शोधात असल्याचं तिनं सांगितलेलं. आता रेशमला तिचा श्रीमानला मिळाला आहे. म्हणजेच अभिनेत्री लवकरच 'श्रीमान श्रीमती' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपासून ‘श्रीमान श्रीमती‘ हे नाटक चर्चेचा विषय ठरलं आहे. प्रेम, लग्न आणि नात्यांकडे हसत-खेळत, पण तितक्याच हळुवारपणे पाहणारं नवं मराठी नाटक ‘श्रीमान श्रीमती’ रंगभूमीवर येत आहे. महालक्ष्मी आणि रंगतसंगत निर्मित, अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे अष्टविनायकचे दिलीप जाधव यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली आनंद काळे यांनी निर्मितीची जबाबदारी उचललेली आहे.
‘श्रीमान श्रीमती’ नाटकाची कथा
प्रेमात पडणं कदाचित सोपं असेल, पण प्रेमासोबत आयुष्यभर जगायला शिकणं हीच खरी गोष्ट आहे, असा विचार हे नाटक मांडतं. लग्न म्हणजे प्रेमाचा शेवट नव्हे, तर समजूतदारपणा, जुळवून घेणं, संयम आणि सोबतीचा एक सुंदर प्रवास आहे. नाटकाची मांडणी एका बापाच्या नजरेतून केली असून विनोद, रोमान्स, भावना आणि कौटुंबिक नाट्य यांचा सुरेख मेळ त्यात पाहायला मिळतो. दोन पिढ्यांचे विचार, बदलत्या अपेक्षा आणि नात्यांमधले रोजचे प्रसंग हलक्याफुलक्या पद्धतीने समोर येतात, आणि हसवता हसवता प्रेक्षकांना अंतर्मुखही करतात.
नाटकातील कलाकार
‘श्रीमान श्रीमती’ या नाटकात आनंद काळे, रेशम टिपणीस, धनश्री काडगावकर आणि ऋतुराज फडके हे लोकप्रिय कलाकार एकत्र दिसणार आहेत. रेशमनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ती ‘श्रीमान‘च्या शोधात आहे, असं म्हटलेलं. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता निर्माण झालेली. अनुभवी आणि ताज्या दमाच्या या कलाकारांची केमिस्ट्री नाटकाचं मोठं आकर्षण ठरेल. कथा-संकल्पना आणि दिग्दर्शन ऋतुराज फडके यांचं असून लेखन अनिल पवार यांनी केलं आहे. नाटकाची तांत्रिक बाजू अनुभवी हातांत आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, वेशभूषा भाग्यश्री लेंभे यांची, तर संगीत अनुराग गोडबोले यांचं आहे.
आजच्या काळात लग्न आणि नातेसंबंध हे विषय प्रत्येक घराशी जोडलेले आहेत. त्यामुळे नवविवाहित जोडपी, वर्षानुवर्षं संसार करणारे आणि मुलांचं लग्न पाहणारे पालक अशा सर्वांना हे नाटक आपलंसं वाटेल. ‘श्रीमान श्रीमती‘ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 30 ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.