हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारते; ‘आशा’मधील रिंकू राजगुरूचे डायलॉग्स व्हायरल

61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवणारा 'आशा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूने आशा सेविकेची भूमिका साकारली असून तिच्या डायलॉग्सची सध्या जोरदार चर्चा आहे.

हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारते; आशामधील रिंकू राजगुरूचे डायलॉग्स व्हायरल
Rinku Rajguru in Asha
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2025 | 9:04 AM

अभिनेत्री रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला ‘आशा’ हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. या चित्रपटात रिंकूने आशा सेविकेची भूमिका साकारली असून महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. या चित्रपटातील काही प्रभावी डायलॉग्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल चर्चेत आले आहेत. विशेषत: रिंकूचा “मी एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यात हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकते” हा डायलॉग प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजतोय.

“माझ्याशी जो वाकड्यात जाईल, त्याची मी खैर करणार नाही”, हा डायलॉगसुद्धा प्रेक्षकांना विशेष भावतोय. ‘आशा’ या चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणं, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहाणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड, तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ यांची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळाली होती.

रिंकू राजगुरूसह या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्याही भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात पहायला मिळतोय. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरतं.

‘आशा’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान रिंकू राजगुरूच्या आईला अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या लेकीला इतक्या मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे दमदार कामगिरी करताना पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी रिंकू तिच्या आईला मिठी मारून त्यांचं सांत्वन करताना दिसली.

दिग्दर्शक दिपक पाटील या चित्रपटाविषयी म्हणाले, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. तिचं सत्य, तिचा वेदनादायी तरीही प्रेरणादायी प्रवास आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.”