आपल्या आराध्य दैवताबद्दल विकृत बरळतो..; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना रितेशने सुनावलं

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेता रितेश देशमुखने तीव्र संताप व्यक्त केला आहे. रितेशने ट्विट करत हे अमान्य आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे.

आपल्या आराध्य दैवताबद्दल विकृत बरळतो..; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना रितेशने सुनावलं
Riteish Deshmukh and Dhirendra Shastri
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 26, 2026 | 3:08 PM

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नागपूरमधील भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सततची युद्धे आणि संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराज थकले होते. त्यांनी थकून आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी ठेवला आणि आता आपल्याला युद्ध करायचं नाही, तुम्हीच हा राज्यकारभार (राजपाट) सांभाळा, अशी विनंती केली. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक शिवप्रेमी आणि शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे, असं तो म्हणाला.

रितेश देशमुखचं ट्विट-

‘कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी – शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज,’ असं ट्विट रितेशने केलं आहे.

नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं,” असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. पुढे रामदास स्वामींनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरू’ असं सांगत पुन्हा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असं ते म्हणाले. तर धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोककथांचा  संदर्भ देत इतिहासात तसा कुठलाही दाखला नसल्याचं नमूद केलं.

Follow Us