
अभिनेता रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते. रितेशने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हापासून ते त्याचे मॅनेजर आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. याविषयी त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. रितेशने राजकुमार यांच्यासोबत एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोसोबत पोस्ट लिहित त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. राजकुमार तिवारी हे रितेशसाठी केवळ एक मॅनेजर नव्हते. तर ते उत्तम मार्गदर्शक आणि एका मोठ्या भावाप्रमाणे कायम त्याच्यासोबत होते.
‘राजकुमार तिवारीजी आमच्यात नाहीत हे जाणून मला अत्यंत दु:ख झालं आहे, मोठा धक्का बसला आहे. ते माझे मार्गदर्शक, माझे मोठे भाऊ, माझं कुटुंब होते. मी पदार्पण केल्यापासून त्यांनी माझ्या कामाचं व्यवस्थापन केलंय. कठीण काळात ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,’ असं त्याने लिहिलं आहे.
रितेश देशमुखने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रितेशने ‘हाऊसफुल’, ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’, ‘धमाल’, ‘रेड 2’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तो मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. ‘बिग बॉस’च्या मराठी व्हर्जनचं सूत्रसंचालन रितेशने केलं होतं. या संपूर्ण प्रवासात राजकुमार यांनी त्याची खूप मदत केली होती. प्रत्येक पावलावर त्यांनी रितेशचं मार्गदर्शन केलं होतं.
राजकुमार तिवारी यांनी रितेशच्या आधी इतरही मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. काही वर्षांपूर्वी खुद्द रितेशने त्यांचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ते विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत दिसले होते. ‘माझे मॅनेजर, माझे आधारस्तंभ.. राजकुमार तिवारी हे इंडस्ट्रीतल्या दोन रॉकस्टार्ससोबत.. विनोद खन्नाजी आणि फिरोज खान साहेब’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.