Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “आपल्या सोयीचं..”

अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'राजा शिवाजी'वरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमधील काही गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या असून त्यावरून ट्रोलिंग झाली होती.

Raja Shivaji : राजा शिवाजीच्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, आपल्या सोयीचं..
रितेश देशमुख (राजा शिवाजी)
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 8:18 AM

अभिनेता रितेश देशमुखचं ड्रीम प्रोजेक्ट, ज्याच्यासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली, तो ‘राजा शिवाजी’ चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 1 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं असून यामधील छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्यानेच साकारली आहे. ‘राजा शिवाजी’च्या टीझर आणि ट्रेलरवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु काहींनी त्याला ट्रोलसुद्धा केलं आहे. टीझर आणि ट्रेलरमधील काही गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या असून त्यावरून काहींनी टीका करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता रितेशनेच प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला याविषयी प्रश्न विचारला असता रितेशने विचारपूर्वक उत्तर दिलं आहे.

“आपल्या सोयीचं कौतुक झालं तर आपण आनंदी होतो आणि नाही झालं तर त्याला आपण ट्रोलिंग म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली जी भावना आहे, जी आस्था आहे, तीच मोठ्या पडद्यावर मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराजांच्या आयुष्यावर, कर्तृत्वावर मोठा, भव्य स्तरावर चित्रपट व्हावा अशी इच्छा होती, स्वप्न होतं. त्यासाठी आमच्या परीने जितके प्रयत्न करता आले, तितके आम्ही केले आहेत. प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट चांगल्या रितीने पोहोचावा हाच आमचा त्यामागील उद्देश आहे, बाकी ट्रोलिंग होत राहतं. त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली आहे.

नुकतंच या चित्रपटातील ‘जय शिवराय’ हे दुसरं गाणं प्रदर्शित झालं. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं ‘जय शिवराय’ हे गाणं केवळ एक पारंपरिक प्रेरणागीत नसून, ते एक प्रभावी कथनात्मक संगीत अनुभव आहे. दमदार ताल, स्पंदनशील बीट्स आणि भव्य ऑर्केस्ट्रेशन यांच्या माध्यमातून या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, निर्धार आणि उदयाची कहाणी अत्यंत प्रभावीपणे उलगडली आहे.

‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे.

Follow Us