
अभिनेत्री रोशनी वालिया लवकरच अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने छोट्या पडद्यावर बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने तिच्या यशाचं श्रेय आईला दिलं. त्याचसोबत आई किती मोकळ्या विचारांची आहे, हे तिने सांगितलं आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत रोशनी म्हणाली, “आज मी जिथे कुठे आहे, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला जातं. तिने माझ्या स्वप्नांसाठी तिचं शहर सोडून मुंबईत राहायला आली. तिच्या त्यागाशिवाय मी कधीच इथवर पोहोचू शकले नसते.”
रोशनीने तिचं बरंच बालपण चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या सेटवर घालवंल आहे. या अनुभवाने ती लवकर परिपक्व झाली. ” “इतक्या कमी वयात मोठ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला आयुष्याबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. मी या इंडस्ट्रीमधील राजकारणाला खूप लवकर समजून गेले होते. हा सर्व अनुभव खूपच अनोखा होता,” असं ती म्हणाली. रोशनीला जेव्हा तिच्या आईच्या काही नियमांबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने सांगितलं, “मी अत्यंत योग्य पद्धतीने मोठी होतेय, असं मला वाटतं. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते. ती मला स्वातंत्र्यही देते आणि माझं योग्य मार्गदर्शनही करते. तिच्या नियमांचं मला कधीच ओझं वाटत नाही. याउलट ती आजच्या ट्रेंडला धरून वागते.”
या मुलाखतीत रोशनीने एक असाही खुलासा केला, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. “माझी आई मला नेहमी प्रोत्साहन देते. ती मला नेहमी या गोष्टीची आठवण करून देते की, जर तू काही करत असशील तर प्रोटेक्शन आवर्जून वापर. माझ्या आधी ती माझ्या मोठ्या बहिणीलाही हीच गोष्ट समजावून सांगायची. आता तोच सल्ला ती मला देते. मी कधी बाहेर फिरायला गेले नाही तर आईच मला म्हणते की, अरे तू आज बाहेर का गेली नाहीस. आज घरीच का बसली आहेस? एंजॉय कर, आज ड्रिंक्ससुद्धा केलं नाहीस का?”, असा खुलासा तिने केला. रोशनीच्या आईचे हे सल्ले ऐकून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझी आई आधुनिक आणि मोकळ्या विचारांची असल्याचं तिने म्हटलंय.