Saba Azad | ‘होय मी वेडीच..’; रॅम्पवर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना हृतिकच्या गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर

सबा ही अभिनेत्रीसोबतच गायिकासुद्धा आहे. तिचा स्वत:चा रॉक बँड आहे. रॅम्पवर सबाचा हा वेगळा अंदाज पहिल्यांदाच पहायला मिळाला. काहींना तिचा हा मोकळा अंदाज आवडला. तर काहींनी त्यावरून बरीच टीका केली. हृतिक रोशनला तुझी लाज वाटत असेल, असंही काहींनी म्हटलंय.

Saba Azad | होय मी वेडीच..; रॅम्पवर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना हृतिकच्या गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर
Hrithik Roshan and Saba Azad
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2023 | 12:20 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. याआधी अनेकदा वयातील अंतरावरून या दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आता सबा तिच्या एका फॅशन शोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सबाने नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये हजेरी लावली होती. फॅशन शोमध्ये सहसा मॉडेल्स रॅम्पवर चालताना दिसतात. मात्र सबा रॅम्पवर चक्क नाचताना दिसली होती. तिचा हा अंदाज काहींना खूपच ‘कूल’ वाटला तर काहींना तिचा डान्स आणि रॅम्पवर तिचं वागणं विचित्र वाटलं. यावरूनच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तुला थेरपीची गरज आहे’, ‘तू वेडी आहेस का’ असे असंख्य कमेंट्स सबाच्या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. त्यावर आता खुद्द सबाने मौन सोडलं आहे.

सबाचा रॅम्प डान्स पाहून अनेकांनी तिला इन्स्टाग्रामवर मेसेजसुद्धा केले आहेत. त्यापैकीच दोन मेसेजेसना सबाने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. ‘तुला थेरपीची गरज आहे’, असं म्हणणाऱ्याला सबाने उत्तर दिलं, ‘होय सर/मॅडम. मी तुमच्याशी सहमत आहे आणि मी नियमितपणे थेरपी घेते. या द्वेषपूर्ण जगात प्रत्येकाने ते केलं पाहिजे. तुम्हीसुद्धा घेऊन पहा. तुम्हाला तुमची स्वत:ची टाकी भरण्यास मदत होईल आणि त्यामुळे इतरांच्या शांततापूर्ण अस्तित्वामुळे तुम्ही नाराज होणार नाही.’

सबा आझादचं सडेतोड उत्तर

‘तू वेडी आहेस का’, अशीही कमेंट एका युजरने केली. ती कमेंट शेअर करत सबाने लिहिलं, ‘होय जाफर. सततच्या या द्वेषपूर्ण वातावरणात, दररोज माझ्याबद्दल नकारात्मक बोललं जात असतानाही मी आजचा दिवस कदाचित चांगला जाईल या आशेनं सकाळी उठण्यासाठी, हसत पुढे चालत राहण्यासाठी मी खरंच वेडी असेन. मी वेडीच असेन कारण हे जग कदाचित तुमच्यासारख्या लोकांनीच भरलेलं आहे. जे फक्त मोबाइलच्या स्क्रीनमागे लपून या जगात फक्त द्वेष पसरवतात. हाच तुमचा वारसा आहे. हाच वारसा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देणार आहात. त्यामुळे अशाच गोष्टी तुम्ही चघळत राहा.’

पहा व्हिडीओ

हृतिक आणि सबा आझादच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.