‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवींची प्रकृती गंभीर; मदतीसाठी धावलेली रणबीरची बहीण या कारणासाठी होतेय ट्रोल

साईबाबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांच्या उपचाराचा खर्च लाखो रुपयांमध्ये असल्याने कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची विनंती केली आहे.

शिर्डी के साईबाबा फेम सुधीर दळवींची प्रकृती गंभीर; मदतीसाठी धावलेली रणबीरची बहीण या कारणासाठी होतेय ट्रोल
सुधीर दळवी, रणबीर कपूर-रिद्धिमा कपूर सहानी
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 8:30 AM

‘शिर्डी के साई बाबा’ या गाजलेल्या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारून अभिनेते सुधीर दळवी घराघरात लोकप्रिय बनले. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. 86 वर्षीय सुधीर दळवी हे सेप्सिस या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 ऑक्टोबरपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुधीर यांच्या उपचारांचा खर्च जवळपास दहा लाख रुपयांवर पोहोचला आहे. त्यांच्यावरील उपचार सुरू असल्याने हा खर्च 15 लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. उपचाराचा एवढा खर्च उचलण्यास त्यांचे कुटुंबीय असमर्थ असून त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली. अशातच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने मदतीचा हात पुढे केला. परंतु एका कारणासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी पैशांची मोठी मदत केल्यानंतर रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ‘मदत केली. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. काहींनी रिद्धिमाच्या मदतीचं कौतुक केलं. परंतु या पोस्टनंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलसुद्धा केलंय. रिद्धिमाने दिखाव्यासाठी मदत केल्याची टीका काहींनी केली आहे. ‘जर तू मदत केली आहेस, तर तुला इथे सांगायची काहीच गरज नव्हती’, असं एकाने लिहिलं. तर ‘मदत केलीच आहे तर प्रसिद्धी का मिळवायची आहे’, असा सवाल दुसऱ्याने केला.

या ट्रोलिंगवर रिद्धिमानेही सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘आयुष्यात सर्वकाही दिखाव्यासाठी केलं जात नाही. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करणं आणि तुम्हाला जमेल त्या क्षमतेनं मदत करणं हा सर्वांत मोठा आशीर्वाद असतो’, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सची बोलती बंद केली.

सुधीर दळवी हे चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी 1977 मध्ये ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. याशिवाय ते रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत ऋषी वसिष्ठ यांच्या भूमिकेत दिसले. त्यांनी ‘जुनून’ आणि ‘चांदनी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांना 2006 मध्ये शेवटचं पडद्यावर पाहिलं गेलंय. ‘हुए ना हमारे’ या मालिकेत ते झळकले होते.