
बॉलिवूड असो किंवा मग हॉलिवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लूकसाठी मेकअप हा गरजेचाच असतो. अनेक अभिनेत्रींनी मुलाखतींमध्ये सांगितले आहे की काहीवेळा तर चक्क 2 ते 3 तास मेकअपमध्ये जातात. चित्रपटसृष्टीत प्रत्येकाला परिपूर्ण लूकसाठी मेकअर आवश्यकच असतो. पण या इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी एकतर मेकअप करतच नाही किंवा मग खूपच बेसिक मेकअप करते. कारण तिची नॅच्युरल ब्यूटीच सर्वांच्या पसंतीस उतरते. तिचा असा विश्वास आहे की व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास मेकअपपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. ही अभिनेत्री म्हणजे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी.
अभिनेत्रीच्या नॅच्युरल ब्यूटीनेच चाहत्यांचे मन जिंकले
सर्वांनाच माहित आहे की साई पल्लवी फार कमी मेकअप करते. खूप साधी आणि नॅच्युरल राहते. आणि तिची हीच नॅच्युरल ब्यूटी सर्वांच्या मनात राहते. म्हणूनच तर आज तिचे लाखो फॅन आहेत. साई पल्लवीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “जर कोणी मला माझ्या मेकअपबद्दल विचारले तर माझ्याकडे त्याचं उत्तर खरंच नसतं. मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुमे आहेत. माझ्या स्वतःच्या असुरक्षिततेच्या काही भावना आहेत. जेव्हा प्रेक्षकांनी माझ्या पहिल्या चित्रपटात मला स्वीकारले तेव्हा मला समजले की पात्र हा सर्वात महत्वाचा पैलू असतो. मी किती सुंदर आहे किंवा मी कसे कपडे घातले आहे हे महत्त्वाचे नाही.”
‘घराबाहेर पडायलाही लाज वाटत असे…’
साई पल्लवी पुढे म्हणाली की, ती किशोरावस्थेत तिच्या मुरुमांमुळे खूप अस्वस्थ असायची. “प्रेममच्या आधी, मी शेकडो क्रीम्स वापरल्या आहेत. कारण माझ्या चेहऱ्यावर खूप मुरुमे होते. मला घराबाहेर पडायलाही लाज वाटत असे. मी घरीच राहायचे आणि लोक नेहमी माझ्या मुरुमांकडे का पाहतात याचा विचार करायचे.”
डायरेक्टर्स देखील सपोर्ट करतात
साई पल्लवीने तिच्या दिग्दर्शकाबद्दली कौतुक केलं आहे. तिला मेकअप करण्यासाठी डायरेक्टर्स कधीही तिच्यावर दबाव आणत नाहीत. ती म्हणाली, “सुरुवातीला दिग्दर्शक मला टेस्ट शूटमध्ये मेकअप करून पाहण्यास सांगत असत, पण नंतर ते म्हणायचे, ‘नाही, आम्हाला तू जशी आहेस तशी आवडतेस. फक्त येऊन इमोट कर. म्हणून मी मेकअप करत नाही. हो, शूटिंगच्या जास्त प्रकाशामुळे डोळे लहान दिसू लागतात, म्हणून डोळे दिसण्यासाठी मी आयलाइनर आणि बिंदी लावते.”
नाकारल्या कोट्यवधी रुपयांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती
साई पल्लवीची सौंदर्याची वाख्या नक्कीच वेगळी आहे. साधी आणि नैसर्गिक आहे. म्हणून आजपर्यंत तिने कधीही फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्या नाही. ती तिच्या तत्त्वांवर ठाम राहिली, साई पल्लवीने एकदा 2 कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रीमची जाहिरातही नाकारली होती. ती म्हणाली, “हा आमचा भारतीय त्वचेचा रंग आहे. आम्ही परदेशी लोकांना विचारू शकत नाही की ते गोरे का आहेत. हा त्यांचा त्वचेचा रंग आहे आणि हा आमचा आहे.” असं म्हणत तिने त्या जाहिरातीही नाकारल्या.