
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख एका ऑटो चालकाने पटवली. कारण त्याच ऑटो चालकाला दुप्पट भाडं देऊन आरोपी सैफच्या घरापर्यंत पोहोचला होता. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपपत्रात एका ऑटो चालकाच्या साक्षीचाही उल्लेख आहे. या ऑटो चालकाने आरोपी मोहम्मद इस्लाम शरीफुल फकीर याला 15 जानेवारी रोजी म्हणजेच गुन्ह्याच्या सुमारे 12 तास आधी सैफ राहत असलेल्या इमारतीजवळील गल्लीत सोडलं होतं. ड्राइव्हर धनंजय चैनीने पोलिसांच्या जबाबात सांगितलं की, त्याला तो माणूस चांगलाच आठवला. कारण त्याने वांद्रे रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी दुप्पट भाडं दिलं होतं.
15 जानेवारी रोजी आरोपी सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामध्ये तो रस्त्यावर थोडा वेळ चालताना, इमारतीत शिरताना आणि काही वेळाने तिथून निघताना दिसून आला. दुपारी 3 ते संध्याकाळी 6.45 दरम्यान त्याने सैफच्या इमारतीच्या परिसराची रेकी केली होती. त्यानंतर सैफ अली खानच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फुटेजमध्ये तो 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.37 वाजता पायऱ्या चढताना आणि एक तासानंतर खाली उतरताना दिसला. दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो पहाटे 3.37 वाजता सैफच्या इमारतीच्या भिंतीला लागून असलेल्या दुसऱ्या इमारतीतून पळून जाताना दिसला.
सैफवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 1600 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे की चोरी आणि चाकूहल्ल्याच्या घटनेपूर्वी आरोपीला ते घर सैफचं असल्याची अजिबात माहिती नव्हती. मोहम्मद शरीफुलने पोलिसांना सांगितलं की जेव्हा त्याने युट्यूबवर हल्ल्याची बातमी पाहिली तेव्हा त्याला समजलं की त्याने सुपरस्टार सैफ अली खानवर हल्ला केला आहे. सैफच्या घरातून पळून गेल्यानंतर शरीफुल मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होता. त्याने दादर रेल्वे स्टेशनबाहेरून 50 रुपयांचा इअरफोन विकत घेतला होता. या इअरफोनद्वारे मोबाइलमधील गाणी ऐकून तो स्वत:ला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता.