सेटवर साजिद खानचा अपघात, पायाला मोठी दुखापत; बहीण फराह खान म्हणाली..

दिग्दर्शक साजिद खानचा एका शूटिंगदरम्यान अपघात झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. याविषयी त्याची बहीण फराह खानने माहिती दिली आहे. एकता कपूर निर्मित एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान त्याचा अपघात झाला.

सेटवर साजिद खानचा अपघात, पायाला मोठी दुखापत; बहीण फराह खान म्हणाली..
Sajid Khan and Farah Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2025 | 4:20 PM

बॉलिवूड दिग्दर्शक आणि सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोचा माजी स्पर्धक साजिद खानचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. साजिद खान एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना हा अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात साजिदच्या पायाला दुखापत झाली आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता साजिदची बहीण, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने साजिदच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खान शनिवारी अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर रविवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

निर्माती एकता कपूरच्या एका प्रोजेक्टचं शूटिंग करताना सेटवर साजिद खानचा अपघात झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्या दुखापतींची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. रविवारी त्याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता एका वेबसाइटशी बोलताना फराह खान म्हणाली, “साजिदच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता पूर्णपणे बरा आहे. त्याची प्रकृती ठीक होत आहे.”

साजिद खानने नुकताच आपला 55 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याने ‘हमशकल्स’, ‘हे बेबी’ आणि ‘हाऊसफुल’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. परंतु गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्याने एकही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही. 2014 मध्ये त्याने ‘हमशकल्स’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 2018 मध्ये भारतात ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत साजिद खानवर अनेक गंभीर आरोप झाले होते. यात कलाकारांसोबत पत्रकार महिलांचाही समावेश होता. या आरोपांचा साजिदच्या आयुष्यावर आणि करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. रातोरात त्याला प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर साजिद ‘बिग बॉस’च्या सोळाव्या सिझनमध्ये दिसला.

आरोपांच्या सहा वर्षांनंतर त्याने प्रतिक्रिया दिली होती. “गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा माझं आयुष्य संपवण्याचा विचार केला. हा काळ अत्यंत वाईट होता. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडून (IFTDA) क्लिन चिट मिळाल्यानंतरही माझ्या हाती काम नव्हतं. आता कुठे मी माझ्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. मला माझं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं, कारण कमाई काहीच नव्हती.”