
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्यापासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेत इन्स्टाग्रामवरील लग्नासंबंधीचे सर्व फोटो आणि रील काढून टाकले. यादरम्यान कोरिओग्राफर मेरी डिकोस्टासोबत पलाशच्या फ्लर्टिंगचे चॅट्स समोर आले. त्यावरून पलाशने स्मृतीची फसवणूक केली, अशी टीका होऊ लागली. अशा असंख्य चर्चा होत असताना आता प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांचं त्यांचं मोकळं मत मांडलं आहे. स्मृतीच्या जागी आपल्या घरातली मुलगी किंवा बहीण असती, तरी आपण असं बोललो असतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.
“मित्रमैत्रिणींनो, आपण असे का वागतो? स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही घडलं असेल, ते ती बघेल आणि तिच्या जवळची लोकं बघतील. आपल्या घरातली मुलगी असती, बहीण असती, तर आपण असं बोललो असतो का? काय हौस आहे की सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहीत आहे, सगळ्यांच्या आधी आपल्याला माहीत आहे हे सांगण्याची? कोणाच्या मृत्यूच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत घाई कसली आहे बातम्या पसरवण्याची, माहिती नसताना वाढवून सांगण्याची? हे काय आहे? थोडंसं दयाळू आणि थोडं समजूतदार बना. आपल्या घरचं कोणी त्याठिकाणी असतं, तर आपण तसं केलं नसतं. तुम्हाला आधी कळलं तर असं कोणतं यश मिळणार आहे? जरा आपापलं बघुयात ना,” असं मत सलील कुलकर्णी यांनी मांडलं आहे.
सलील कुलकर्णी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुमचं अगदी बरोबर आहे, स्मृती आपल्या देशाची मुलगी आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘इथे लोकांचं निधन होण्याआधी त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते, तर आणखी काय वेगळी अपेक्षा करणार’, असं मत दुसऱ्या युजरने मांडलंय. आणखी एकाने यात स्मृती-पलाशचीही चूक असल्याचं म्हटलंय. ‘त्यांनी त्यांचं खासगी आयुष्य इतकं सार्वजनिक केलंय आणि सोशल मीडियावर पोस्ट केलंय, तर नेटकरी प्रतिक्रिया देणारच ना’, असं संबंधित युजरने लिहिलं आहे.