Salman Khan: ‘त्याने मला मारलं, शिवीगाळ केली’; सलमान खानवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

सलमान खानवर अभिनेत्रीकडून खळबळजनक आरोप; म्हणाली "माझ्या एकटीसोबतच हे सर्व घडलं नाही तर.."

Salman Khan: त्याने मला मारलं, शिवीगाळ केली; सलमान खानवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप
Salman khan
| Updated on: Jan 06, 2023 | 8:05 AM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमीने सोशल मीडियावर एक नाही तर अनेक पोस्ट शेअर केले आहेत. या पोस्टद्वारे तिने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमीने सलमानवर आरोप करायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने सोशल मीडियाद्वारे सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. मात्र नंतर तिने हे पोस्ट डिलिट केले. आता पुन्हा एकदा सोमी सलमानविषयी व्यक्त झाली आहे.

सलमान खानवर गंभीर आरोप

सोमीने तिच्या पहिल्या पोस्टची सुरुवात ‘नो मोअर टीअर्स’ या एनजीओने केली. मानव तस्करी आणि कौटुंबिक हिंसेनं पीडित असलेल्यांसाठी ही संस्था सुरू केल्याचं तिने सांगितलं. गेल्या 15 वर्षांत तिने या संस्थेअंतर्गत केलेल्या कामावर आधारित एक डॉक्युमेंट्री सीरिज ओटीटीवर येणार असल्याचं तिने जाहीर केलं.

त्यानंतर तिने लिहिलं, ‘नो मोअर टीअर्स या संस्थेची सुरुवात कशी झाली हे सांगणं खूप गरजेचं आहे. मी लहानपणापासून कौटुंबिक हिंसेचा सामना केला आहे. मी पाच वर्षांची असताना माझं लैंगिक शोषण झालं. त्यानंतर नऊ वर्षांची असताना पाकिस्तानात एका घरकाम करणाऱ्या व्यक्तीने माझं शारीरिक शोषण केलं. 14 व्या वर्षी अमेरिकेत माझ्यावर बलात्कार झाला. त्यानंतर भारतात मी जवळपास आठ वर्षे कौटुंबिक अत्याचार सहन केलं. त्या व्यक्तीचं नाव न घेता मी यावर आधीही व्यक्त झाले होते.’

सलमानशी करायचं होतं लग्न

सोमीने सांगितलं की तिचं भारतात येण्याचं कारण सलमान होता. 16 व्या वर्षी तिला सलमान आवडू लागला होता. अमेरिकेतून ती भारतात सलमानशी लग्न करायला आली होती. “त्यावेळी मी लहान होते. मोठ्या पडद्यावर साकारलेल्या भूमिका या माझ्या खऱ्या आयुष्यापेक्षा खूप वेगळ्या होत्या. मला याचं वाईट वाटतं की त्यावेळी मी सत्य सांगायाचा प्रयत्न केला तर लोकांनी त्याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं. महिलांनीही मला पाठिंबा दिला नव्हता”, असं ती म्हणाली.

सलमानकडून मारहाण आणि शिवीगाळ

‘सलमानने माझ्या सीरिजवर बंदी आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. न्यूयॉर्कमध्ये त्याचा वकीलसुद्धा होता. त्या वकिलाने मला धमकीचे मेल पाठवले. जर मी सलमानविरोधात काही बोलले तर मला जीवे मारणार, अशीही धमकी दिली. मी जेव्हा मुंबईमध्ये होती, तेव्हा सलमान मला शिवीगाळ करायचा, मारायचा. घरकाम करणाऱ्याने मला रडताना पाहिलं होतं’, असं तिने लिहिलं.

‘त्यावेळी मेकअप आर्टिस्ट अजय शेलार हे माझ्या मानेवर आणि अन्य ठिकाणी फाऊंडेशन लावून जखमेच्या खुणा लपवायचे. मी जेव्हा स्टुडिओत जायचे, तेव्हा निर्मात्यांना मारहाणीविषयी समजायचं आणि ते अजयला मेकअपने खुणा लपवायला सांगायचे’, असा खळबळजनक आरोप सोमीने सलमानवर केला.

सलमानने हे फक्त माझ्यासोबतच नाही तर इतर अनेकांसोबत केलंय. काहींनी तर एफआयआरसुद्धा दाखल केले आहेत, असंही ती म्हणाली. सोमीच्या या आरोपांवर आता सलमान काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.