सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी अफवांना दिला पूर्णविराम

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या 'मातृभूमी'च्या प्रदर्शनाबाबतच्या अफवांना पूर्णविराम देत निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी अफवांना दिला पूर्णविराम
| Updated on: Jul 20, 2026 | 5:27 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, या सर्व अफवांना आता सलमान खान फिल्म्स (SKF) ने अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवे पोस्टर शेअर करत चित्रपट 2026 मध्येच प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. ‘मातृभूमी’बाबतही अशीच चर्चा सुरू असताना काही सोशल मीडिया पोस्ट आणि माध्यमांतील बातम्यांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन 2027 पर्यंत पुढे ढकलल्याचा दावा करण्यात आला होता. या अफवांनंतर निर्मात्यांनी स्वतः पुढे येत अधिकृत माहिती जाहीर केली.

20 जुलै रोजी सलमान खान फिल्म्सने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले. पोस्टरवर 2026 असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, ‘एका सैनिकाचे वचन… एका कुटुंबाची ताकद… एका देशाचा अभिमान.’ असे भावनिक शब्द वापरण्यात आले आहेत. या पोस्टमुळे चित्रपट 2026 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

नवीन प्रदर्शन तारीख मात्र अद्याप गुप्त

निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शन वर्षाची पुष्टी केली असली, तरी नेमकी रिलीज डेट अद्याप जाहीर केलेली नाही. यापूर्वी हा चित्रपट एप्रिल 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आता चित्रपटाची नवी अधिकृत प्रदर्शन तारीख कधी जाहीर होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

‘बैटल ऑफ गलवान’ ते ‘मातृभूमी’

विशेष म्हणजे, या चित्रपटाचे सुरुवातीचे नाव ‘बैटल ऑफ गलवान’ असे होते. नंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘मातृभूमी’ असे ठेवले. नव्या शीर्षकासह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधील देशभक्तीची झलक आणि सैनिकाच्या आयुष्यावर आधारित कथानकाची झलक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सलमान खानचा हा चित्रपट देशभक्ती, कुटुंब आणि सैनिकांच्या त्यागाची कथा मांडणार असल्याची चर्चा असून, अधिकृत प्रदर्शन तारखेची घोषणा कधी होणार याची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

Follow Us