पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

अभिनेता सलमान खानचं पनवेलमधील फार्महाऊस अनेकदा चर्चेत असतं. मात्र हे फार्महाऊस माझं नाही, असं खुद्द सलमानने नुकत्याच एका चॅट शोमध्ये म्हटलंय. भाऊ अरबाज खानच्या शोमध्ये तो याविषयी व्यक्त झाला.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा
सलमान खानचं पनवेलमधील फार्महाऊस
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 2:42 PM

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या प्रॉपर्टीपैकी पनवेलमधील फार्महाऊसचा उल्लेख वारंवार होतो. पनवेल याठिकाणी सलमानचा खूप मोठा फार्महाऊस आहे. 2020 मधील कोविड महामारीदरम्यान सलमान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत याच फार्महाऊसमध्ये राहत होता. इतकंच नव्हे तर आताही सलमान बहुतांश वेळ तिथेच असतो, असा खुलासा त्याचा मेहुणा आयुष शर्माने केला. जवळपास 150 एकर परिसरात त्याची ही प्रॉपर्टी असून या फार्महाऊसची किंमत जवळपास 80 कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातं. पण हे फार्महाऊस सलमानचं नसून दुसऱ्याच एका व्यक्तीचं आहे. खुद्द ‘भाईजान’ने याविषयीचा खुलासा केला आहे.

सलमान अनेकदा सोशल मीडियावर फार्महाऊसवरील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सलमानने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत एका खास गाण्याचं शूटिंगसुद्धा तिथेच केलं होतं. नुकताच तो भाऊ अरबाज खानच्या चॅट शोमध्ये पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी अरबाजने सलमानला त्याच्या पनवेल फार्महाऊसविषयी विचारलं. त्यावर त्याने उत्तर दिलं की, ते फार्महाऊस त्याचं नाही. ते बहीण अर्पिता आणि इतर सर्वांचं आहे. सलमानचं त्याची बहीण अर्पिता खान शर्मासोबत खूप घनिष्ठ नातं आहे. “माझ्या कुटुंबात जवळपास 250 ते 300 लोकं आहेत, त्यामुळे याला कुटुंब न म्हणता जिल्हाच घोषित केलं जाऊ शकतं”, अशी मस्करीही सलमानने यावेळी केली.

पनवेलच्या फार्महाऊसशिवाय सलमानकडे इतरही बरीच संपत्ती आहे. सलमानला निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडतं. यासाठी त्याने गोराईच्या समुद्रकिनारी एक घर घेतलंय. या पाच बीएचके बीच हाऊसमध्ये एक जिम, थिएटर, बाइक क्षेत्र आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे. सलमानला गाड्यांचीही फार आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. सलमानच्या कार कलेक्शनमध्ये 82 लाखांची मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी A8 L ची किंमत 13 कोटी रुपये, BMW X6 ची किंमत 1.15 कोटी रुपये, टोयोटा लँड क्रूझरची किंमत 1.29 रुपये, ऑडी आरएस 7 ची किंमत 1.4 कोटी रुपये, रेंज रोव्हरची किंमत 2.06 रुपये, ऑडी आर 8 ची किंमत 2.31 कोटी रुपये आणि लेक्सस LX470 ची किंमत 2.32 कोटी रुपये आहे.

Follow Us